मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 January 2021

‘बिल्डिंग चांगल्या झाल्यात. पण, लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी गॅलरीच्या सुरक्षा कठड्यांची उंची वाढवा. तीन फुटांऐवजी पाच फुटांपर्यंत करा. भूमिगत टाक्‍यांची उंची जमिनीपासून दीड ते दोन फूट उंचावर ठेवा,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

पिंपरी - ‘बिल्डिंग चांगल्या झाल्यात. पण, लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी गॅलरीच्या सुरक्षा कठड्यांची उंची वाढवा. तीन फुटांऐवजी पाच फुटांपर्यंत करा. भूमिगत टाक्‍यांची उंची जमिनीपासून दीड ते दोन फूट उंचावर ठेवा,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवनगर विकास प्राधिकरणातर्फे सेक्‍टर १२ मध्ये आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाची पाहणी पवार यांनी शुक्रवारी केली. त्या दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरी-निगडी स्पाइन रस्त्यालगत एमआयडीसी क्षेत्राला लागून असलेल्या सेक्‍टर १२ मध्ये गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेनुसार आर्थिक दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय डिसेंबर २०१५ मध्ये सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत टप्पा एकमधील प्रकल्प प्रगतिपथावर आहे. त्यातील सदनिकांचे बांधकाम, मोकळी जागा, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, विद्युत व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, सुरक्षितता आदींची पाहणी करून पवार यांनी माहिती घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे, नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका मंगला कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.

भविष्यातील नियोजन
प्राधिकरण सेक्‍टर १२ मध्ये सध्या विकसित होत असलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्राचा सुधारित आराखडा करण्यात आला आहे. त्यात भविष्याचा विचार करून अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी गृहयोजना व व्यापारी संकुल, शैक्षणिक संकुल, खुल्या जागा आरक्षित करून रेखांकन केले आहे. त्याचा प्रस्ताव नगररचना संचालकांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्प

  • ९.३४ हेक्‍टर एकूण जागा
  • ४५ एकूण इमारती
  • ४८८३ निवासी गाळे
  • १४० व्यापारी गाळे

दृष्टिक्षेपात सदनिका

  • ३३१७ ईडब्ल्यूएस सदनिका
  • २९.५० चौरस मीटर प्रतिसदनिका क्षेत्र
  • १५६६ एलआयजी सदनिका
  • ५९.२६ चौरस मीटर प्रतिसदनिका क्षेत्र

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prioritize the safety of children Ajit Pawar Home Project Watching