
चिखलीतूनसाडे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण; आरोपी अटकेत
पिंपरी : साडे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दहा तासात या बालिकेची सुटका केली. नरबळीसाठी अपहरण केल्याची चर्चा आहे. संतोष मनोहर चौघुले (वय 41) व विमल चौघुले (वय 28, दोघेही रा. महादेव नगर, जुन्नर ) अशी आरोपींची नावे आहेत. या दाम्पत्याने बालिकेच्या अपहरणाचा प्लॅन केला होता. त्यानुसार विमल चौघुलेने पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेली तिची बहीण सुनीता नलावडे हिला याची कल्पना दिली. तिने घराजवळील कुटुंबात साडे तीन वर्षाची मुलगी असल्याचे कळवले.
यासाठी विमलने त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला बहिणीच्या घरी पाठवले. तो त्या मुलीला खाऊ द्यायचा, तिच्यासोबत खेळायचा. दरम्यान, शनिवारी दुपारी खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला घरापासून दूर नेले. तेथून विमलने मुलीला जुन्नरला नेले. दरम्यान, बराच वेळ होऊनही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले बारा वर्षाच्या मुलासोबत बालिका दिसून आली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने विमलच्या घरी जुन्नर पोलिसांना पाठविले. तिथे बालिका आढळली. तेथून बालिकेची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, नरबळीसाठी या बालिकेचे अपहरण केल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Pune Crime News Chikhli Girl Kidnapped Accused In Custody
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..