
वाकड फाटा ते वाकड पोलिस ठाणे ह्या अवघ्या सहाशे मिटर रस्त्याचे काम दोन वर्षे संपत आले तरीही अतिशय संथ गतीने आणि ठेकेदाराच्या सोयीनुसार सुरू आहे.
घराबाहेर पावासाचा राडा, रस्त्यावर खड्डे अन चिखलाचा सडा
वाकड - वाकड फाटा ते वाकड पोलिस ठाणे ह्या अवघ्या सहाशे मिटर रस्त्याचे काम दोन वर्षे संपत आले तरीही अतिशय संथ गतीने आणि ठेकेदाराच्या सोयीनुसार सुरू आहे. हा रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे त्यातच दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे, चिखल अन राडारोडा पसरल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या मनः स्तापाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावरील शिव कॉलनी चौकात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी हा रस्ता मंगळवारी खोदण्यात आला. त्यातच शिव कॉलनी कमानी समोरील पोलीस ठाण्यापर्यंतची एक लेन तीन महिन्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लेनवर प्रचंड खड्डे, पाणी, खडी, चिखल पसरल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकच लेन सुरू वाहतूक कोंडी होत आहे तर परिसरातील नागतिकांना येजा करणे जिकिरीचे बनले आहे.

ह्या अर्बन स्ट्रीट मॉडेलच्या रस्त्याच्या कामास १६ महिन्यांचा कालावधी होता मात्र वेळ संपूनही आज पर्यंत अर्धे देखील काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे वाकड पोलीस ठाणे चौक व शिव कॉलनी चौकात सकाळी सायंकाळी वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. याबाबत स्थापत्य विभागाच्या उपअभियंता संध्या वाघ म्हणाल्या, जमिनी खालील सेवा वाहिन्यामुळे कामाला वेळ लागत आहे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक वार्डन नेमण्यात येतील.