Raj Thackeray : राज्यकर्ता व्यापारी नसावा; राज ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray : राज्यकर्ता व्यापारी नसावा; राज ठाकरे

Raj Thackeray : राज्यकर्ता व्यापारी नसावा; राज ठाकरे

पिंपरी : राज्यकर्ता मोठ्या मनाचा असावा. राज्यकर्ता कधी व्यापारी नसावा, असे मत महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहात रविवारी(ता. ८) व्यक्त केले.

जागतिक मराठी अकदामी आणि पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ जगातिक मराठी संमेलन २०२३ मधील ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ या विषयावरील परिसंवादात व्यंगचित्रकार राज ठाकरे यांची मुलाखत संवादक जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते.

पसिंवादात विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, वडिल व बाळासाहेबांनी मला कार्टून शिकविले. व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे. कलाकृती सूचली अनं ती काढता न येणे हा कलाकाराचा पराभव आहे. व्यंगचित्रात सराव हा महत्वाचा भाग आहे. ब्रिटनचे प्रख्यात व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांचा माझ्यावर प्रभाव होता. सोशल मिडीया पेक्षा वर्तमानपत्रात व्यंगचित्र येण्याची मजा वेगळीच आहे.

विचार करणाऱ्या माणसांनी राजकारणात आले पाहिजे. बुध्दीवादी वर्ग राजकारणाकडे तुच्छतेने पाहतो. आता पैस्यांचा खेळ चालू आहे. यावर काय करायचे, असा प्रश्‍न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, राजकारणात पैसे लागतात हे खरे आहे.

पण; लोकांची मनेही जिंकावी लागतात ना. समाजकारणातही काम करणारे अनेक लोक आहेत. परंतु; ते जे काम करतात त्याला राजकीय धार आल्याशिवाय ते प्रश्‍न सुटणार नाहीत. राजकारण काही लोकांनी खराब केले असेल तर; तुम्ही ते सुधरवा. तुमची तशी इच्छा असेल तर मी तुमच्याबरोबर आहेे.

वाईरकर यांनी अवघ्या पाच मिनीटात व्यासपीठावर राज ठाकरे यांचे व्यंगचित्र रेखाटले. संमलेनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे, अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, सदस्य सचिन इटकर यांनी अकोलकर व वाईरकर यांचा सत्कार केला.

‘सध्या सुठाच्या राजकारणापेक्षा बडबडण्याचे राजकारण जास्त’

सध्याच्या सुडाच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सध्या सुडाच्या राजकारणापेक्षा बडबडण्याचे राजकारण जास्त आहे. भविष्यात राजकारणात येणारे तरुण मुले-मुली याकडे बघून काय म्हणणार. असे बडबडायचे राजकारण आपण करायचे का, असा प्रश्‍न त्यांच्या डोक्यात येणार.

चॅनेल्सवर दिवसभर जी ‘पकपक’ दाखविली जाते, ती दाखवून आपण येणाऱ्या पिढ्या बरबाद करत आहोत. हिंदीत जे दाखवतात तेच आपण मराठीत दाखविण्याचा प्रयत्न करतोय. मराठी भाषा ही शुध्द यायला हवी, ती येत नसेल तर सुधारुन घ्या. राज्याच्या विविध भागात भाषेचा लहेजा वेगवेगळा आहे. विदर्भातून चॅनेलमध्ये आलेल्या पत्रकाराच्या भाषेत हिंदी शब्द येणार.

‘ती’ दोन व्यक्तिमत्व राज्यातील लोकांच्या डोक्यात अजूनही फिट बसली

राज्यात बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, याकडे तुम्ही कसे बघता, असे विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, या दोन्ही नेत्यांनी राज्याच्या राजकारणावर परिणाम केला, हे खरे आहे. त्यांनी खुप मोठा काळ पाहिला. आपल्या डोक्यात जुन्या चित्रपटांची कथा जशा फिट होत्या तशी ही दोन व्यक्तिमत्व लोकांच्या डोक्यात अजूनही फिट आहेत.