‘रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पिंपरीतील जागा द्या’; मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा पिंपरी येथे उभारण्यात येणार आहे.

Pimpri News : ‘रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पिंपरीतील जागा द्या’; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी - भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती, माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पिंपरी येथील भीमसृष्टीला लागून असलेली जागा मिळावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यागमुर्ती रमाई भीमराव आंबेडकर स्मारक कृती समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने समिती सदस्य धम्माराज साळवे, संतोष जोगदंड, संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा पिंपरी येथे उभारण्यात येणार आहे. या पुतळा स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये २०१७ ते २०२२ या कालखंडात भाजपची एकहाती सत्त्ता असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, महापौर, पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड शहरातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.

या बैठकीमध्ये भीमसृष्टीला लागून असलेली जागा त्यागदमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी, अशी घोषणा पत्रकार परिषद तत्कालीन महापौर, पक्षनेते यांनी केली. तसेच; आयुक्त आणि प्रशासन अधिकारी यांना जागा देणे संदर्भात आदेश दिले व तसे प्रसिद्धीपत्रकही जाहीर करण्यात आले. मात्र जागा देण्यासंदर्भात अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय सहकार्य केले जात नाही. आज या दिरंगाईमुळे आंबेडकरी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री शिंदे शहरात आलेले असताना हे निवेदन त्यांना देण्यात आले होते.

स्मारकासाठी जागा देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

गेली पंधरा-सोळा वर्षे या स्मारकासाठी आम्ही लढा देत असून आपण माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी नियोजित जागा देण्याबाबत राज्य शासनाने पुढाकार घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला आपणकडून देण्यात यावे, असे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना स्मारक कृती समितीच्यावतीने समिती सदस्य साळवे, जोगदंड, शिंदे यांनी दिले. यावेळी स्मारकासंदर्भात सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला सूचना करू, असे शिंदे यांनी आश्‍वासन दिल्याची माहिती जोगदंड यांनी दिली.