पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेचे सायरन का वाजतायेत, काय आहे वास्तव? घ्या जाणून

सुवर्णा नवले
Thursday, 20 August 2020

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या रुग्णवाहिकेच्या सायरनचा अंगावर शहारा आणणारा आवाज वारंवार कानी पडतोय.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या रुग्णवाहिकेच्या सायरनचा अंगावर शहारा आणणारा आवाज वारंवार कानी पडतोय. नकळत सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतोय. आपसूकच रुग्णवाहिकेला वाट करुन दिली जात आहे. मात्र, सायरनचा आवाज अत्यवस्थ रुग्णांना ने-आण करण्यासाठीच होणे गरजेचे आहे. तसे न होता खासगी रुग्णवाहिका चालक सायरन डेसिबलचे उल्लंघन करुन क्षमतेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवीत आहेत. कोरोना संशयित सर्वसामान्य रुग्णांसाठी देखील सायरन वाजवून शहरातील वातावरण काही चालक तणावपूर्ण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना कालावधीत काम करण्यासाठी रुग्णवाहिका घेतल्या आहेत. खासगी तत्त्वावरील रुग्णवाहिका शव वाहणे व अत्यवस्थ रुग्णांसाठी काम करत नाहीत. या केवळ कोविड सेंटर व वायसीएमसह महापालिकेच्या दवाखान्यात पॉझिटिव्ह रुग्णांची ने-आण करण्यासाठी आहेत. खासगी तत्त्वावरील रुग्णवाहिकेवर अंतिम संस्कार व जोखमीच्या रुग्णांची कोणतीही अतिरिक्त जबाबदारी सोपविलेली नाही. खासगी दवाखान्यांमध्ये कोविडसाठी काम करणाऱ्या रुग्णवाहिकांवरही कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे सामान्य रुग्णांसाठी हॉर्न वाजविणे गरजेचे नसल्याचे मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. 

गणरायाच्या स्वागताला उद्योगनगरी सज्ज; अशी चाललीय खरेदीची लगबग

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी तत्वावरील रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन, पीपीई कीट उपलब्ध नाहीत. केवळ स्ट्रेचर आहे. रुग्ण असल्यास केवळ दोन व तीन नातेवाईक रुग्णवाहिकेत असतात. सध्या रुग्णवाहिकेवर काम करणारे 30 टक्के मालक व 50 टक्के चालक आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आदी राज्यांमध्ये रुग्णवाहिका रुग्णांना सोडण्यासाठी त्यांच्या गावी जात आहेत. मात्र, सायरन न वाजवता लांब पल्ल्याच्या रुग्णवाहिका सुखरुप प्रवास करीत आहेत. यासाठी जीपीएस ट्रॅकर रुग्णवाहिकेमध्ये बसविलेले आहे. याउलट पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण, खेड, म्हाळुंगे, बालेवाडी भागातील रुग्णवाहिका नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. 

काय होतोय दुरुपयोग 

शहरात रुग्णवाहिका रस्त्याने जात असताना त्यात रुग्ण आहे, की नाही याची कल्पना दवाखान्यांशिवाय इतरांना नसते. त्यामुळे पोलिसांसह आरटीओदेखील रुग्णवाहिका थांबवीत नाहीत. उलट रुग्णवाहिकेला वाट करून दिली जाते. वाहतूक कोंडी देखील नसते. कुठेही रांगा नसून सिग्नलवरुन रस्ता मोकळा असूनही सायरन वाजवीत सुसाट गाड्‌या रस्त्याने जात आहेत. 

शहरात काही नवीन रुग्णवाहिका चालक आहेत ते वारंवार सायरन वाजवतात. मात्र, वीस ते पंचवीस वर्षांपासून काम करणारे कोणतेही चालक सायरन वाजवीत नाहीत. त्यांना गरजही पडत नाही. रुग्णवाहिका पाहूनच नागरिक सहकार्य करतात. श्‍वास घेण्यास अडथळा होत असलेल्या व गरोदर महिलांसाठी रुग्णवाहिकेची गती वाढवून सायरन लावणे आवश्‍यक आहे. मात्र, खासगी रुग्णवाहिकेवर नव्याने भरती झालेले चालक भरधाव वेगाने वाहन चालवीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपघात होण्याचीही दाट शक्‍यता आहे. 
- रुग्णवाहिका मालक, कासारवाडी 

सोसाट्या म्हणतायेत... 

संशयित रुग्ण आढळल्यासही रुग्णवाहिका विनाकारण सायरन वाजवीत सोसायट्यांमध्ये प्रवेश करीत आहेत. सायरन जोरात वाजल्याने सोसायटीत नेमका कुठे व कोणत्या प्लॅटमध्ये रुग्ण सापडला आहे हे त्वरीत निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी संशयित रुग्णांना शांततेत व दिलासा देत रुग्णवाहिकेत नेणे गरजेचे आहे. 

रुग्णवाहिकेच्या वाहनांची कागदपत्रे तपासणी व परवानगीचे काम आमच्याकडे आहे. रुग्णवाहिकांना रस्त्याने थांबवून सहसा तपासणी केली जात नाही. त्यामुळे रुग्णवाहिका गैरवापर करून नियमांचे उल्लंघन करत आहेत का, याची शहानिशा करणे कठीण जाते. 
- अतुल अदे, उपनगर प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड 

रुग्णवाहिका संख्या : 

  • वायसीएम - 14 
  • 108 रुग्णवाहिका - 11 
  • वायसीएमच्या खासगी तत्त्वावरील - 80 
  • खासगी दवाखान्यांच्या - शंभरहून अधिक 

काय आहेत रुग्णवाहिकेचे नियम 

  • रुग्णाच्या नातेवाइकाच्या परवानगीशिवाय हॉर्न वाजवू नये 
  • रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंदी 
  • ध्वीनीची मर्यादा ओलांडल्यास आरटीओ व पोलिसांकडून कारवाई 
  • रुग्णवाहिकेवर केवळ स्टीकरची गरज 
  • सध्या सायरन डेसिबल मर्यादा 110 ते 120 

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reality behind the ambulance siren sounding in pimpri chinchwad