‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंदणी : अवघ्या तीन तासांत दोन हजार बैलगाडा ‘टोकन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bullockcart token registration
‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंदणी : अवघ्या तीन तासांत दोन हजार बैलगाडा ‘टोकन’

‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंदणी : अवघ्या तीन तासांत दोन हजार बैलगाडा ‘टोकन’

पिंपरी - देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी अवघ्या तीन तासांत २ हजाराहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोकन बूक होणारी ही इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव होणार असून, शेतकरी, बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.

टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. दि. २८ ते ३१ मे २०२२ सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत अत्यंत नियोजनबद्ध ही शर्यत होणार आहे.

बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन बंधनकार केले होते. रामायण मैदानावरील सभागृहात गुरूवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत टोकन स्विकारण्यात आले. यावेळी बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली. या टोकनचा ‘लकी ड्रॉ’ काढून शर्यतीचे नियोजन करण्यात येणार आहे. एका बॉक्समध्ये २ हजार नावांच्या चिठ्ठया टाकल्या जातात. त्याद्वारे पहिली चिठ्ठी मिळालेला बैलगाडा पहिल्यांदा धावणार, असे नियोजन केले जाते. टोकनची रक्कम घाटात गाडा जुंपल्यावर परत दिली जाते, असे राहुल सस्ते यांनी सांगितले.

घाट एकूण १२ सेकंदाचा आहे. त्याआधारे डिजिटल घड्याळाच्या आधारे किती सेकंदात बैलगाडा शर्यत पूर्ण करतो याची नोंद केली जाते. सुमारे २ हजार बैलगाडा या घाटात धावणार आहेत. त्यापैकी पहिल्या १२० गाडा मालकांना दुचाकी बक्षीस मिळणार आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्ये धावणाऱ्या बैलगाडा मालकांना जेसीबी, बुलेरो, ट्रॅक्टर आणि रोख पारितोषिक अशा बक्षीसांसाठी शर्यत होईल.

परराज्यातूनही शर्यतीला प्रतिसाद…

लक्षवेधी बक्षीसांची मेजवानी असल्यामुळे शर्यतीला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू याठिकाणाहून बैलगाडा मालकांनी टोकन बुक केले आहे. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, जालना, नाशिक, सिन्नर यासह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे देशभरातून बैलगाडा सहभगी होणारी ही राज्यातील आणि देशातील पहिली बैलगाडा शर्यत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

… अशी आहे नियमावली

१) बैलगाडा मालकाने एकदा जुंपलेला बैल दुसऱ्या गाड्यामध्ये जुंपल्यास दोन्ही गाडे बाद केले जातील.

२) प्रत्येक बैलाची बैद्यकीय तपासणी करण्यात येईल.

३) जुकाटाखाली आलेला बैल जर खिळ मारुन बाहेर काढला, तर त्या गाड्याचे सेकंद सांगितले जाणार नाही.

४) दि. २८ ते ३१ मे पर्यंत घाटाच्या तळामध्ये बॅरिकेट सिस्टीम केलेली असल्यामुळे फक्त बैलगाडा मालक व जुंपणारे बॅरिकेटच्या आतमध्ये सोडले जातील.

५) बैलगाडा घाटाचा तळ व निशाना जवळील भाग पूर्णपणे रिकामा ठेवण्यात येईल.

सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त…

बैलगाडा शर्यतीसाठी प्रचंड गर्दी होणार असल्याने बैलगाडा घाटाचा पूर्ण ताबा सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडे देण्यात आला आहे. बैलगाडा पार्किंग व्यवस्था स्वतंत्रपणे केली आहे. टू-व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे. प्रत्येक चौकामध्ये बैलगाडा मालकांसाठी पार्किंग आणि दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. चार दिवस जेवण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येक गाडामालक आणि बैलगाडा शौकीनांसाठी टी-शर्ट व टोपी देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी एल.ई.डी स्क्रिनवर लाईव्ह गाडे पाहण्यासाठी सभागृहामध्ये स्वतंत्र व्यवस्था आहे, असेही संयोजकांनी सांगितले.

Web Title: Record Break Registration Two Thousand Bullock Carts Tokens In Just Three Hours

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top