चार दशकांनंतर घरांची स्वप्नपूर्ती; कासारवाडीतील लांडगे झोपडपट्टीतील रहिवाशांची भावना 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

कासारवाडीतील रेल्वे फाटकापासून हाकेच्या अंतरावर लोहमार्गालगत नाल्याच्या काठावर हिराबाई लांडगे झोपडपट्टी आहे. 1970 मध्ये ही झोपडपट्टी घोषित आहे.

पिंपरी : गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून आम्ही येथे राहतोय. दरवर्षी पावसाळ्यात झोपड्यांमध्ये पाणी शिरते. रात्र-रात्र जागून काढावी लागते. रोजंदारीच्या कमाईतून चांगले घर कधी होणार? याचीच चिंता होती. पण, आता सरकारी योजनेमुळे आमच्यासाठी घरांचे काम सुरू झाले आहे. हक्काचे व स्वप्नातील घर मिळणार याचा खूप मोठा आनंद आहे, अशी भावना कासारवाडीतील हिराबाई लांडगे झोपडपट्टीतील रहिवाशांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कासारवाडीतील रेल्वे फाटकापासून हाकेच्या अंतरावर लोहमार्गालगत नाल्याच्या काठावर हिराबाई लांडगे झोपडपट्टी आहे. 1970 मध्ये ही झोपडपट्टी घोषित आहे. एसआरए योजनेअंतर्गत झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थी झोपडीधारकांचे जवळच पत्राशेडमध्ये स्थलांतर केले असून, झोपड्यांच्या जागेवर टोलेजंग इमारत उभी राहात आहेत. 

आकडे बोलतात 

  • जागेचे क्षेत्र : 2340 चौरस मीटर 
  • योजना क्षेत्र : 2850.72 चौरस मीटर 
  • पात्र लाभार्थी : 107 

लाभार्थी म्हणाले... 

आम्ही मूळचे कर्नाटकातील आहोत. चाळीस वर्षांपासून येथे राहते आहे. कष्टाची कामे केली. इतकी वर्ष झोपडीत काढले. आपले स्वतःचे पक्के घर होईल, असे कधी वाटले नव्हते. पण, आता स्वतःचे घर मिळणार आहे. याचाच मोठा आनंद आहे. 
- सुग्राबी टाचूर 

आतापर्यंत खूप कष्टात दिवस काढले. आमच्या झोपड्यांच्या जागेवर मोठी बिल्डिंग उभी राहते आहे. तिथे आम्हाला चांगले घर मिळेल, असे सर्वजण सांगताहेत. त्याचीच मोठी खुशी आहे. असे घर मिळेल, असे कशी वाटले नव्हते. पण, आता घर मिळणार आहे. 
- सायरा सिंदगी 

पहिले आमची झोपडी होती. आता पत्राच्या घरात आणले आहे. आमच्या झोपडीच्या जागेवर चांगली बिल्डिंग बांधली जात आहे. आता आम्हाला प्लॅट मिळणार आहे. आमच्यासारख्या अन्य सर्व लोकांनाही घर मिळाले पाहिजे. 
- सय्यदबी पटेल 

पिंपरी-चिंचवडकरांनो, ख्रिसमसनिमित्त शहरात नवीन नियम लागू

तांत्रिक अडचणींचे 140 बळी 

महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडे 247 झोपडीधारकांची नावे आहेत. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) 131 झोपडीधारकांचीच नोंद आहे. त्यापैकी सदोष नावे व अन्य तांत्रिक कारणांमुळे 24 झोपडीधारकांना अपात्र ठरविले आहे. 107 झोपडीधारकांसाठीच प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. 247 झोपडीधारकांमध्ये बहुतांश झोपड्या रेल्वेच्या हद्दीत आहेत. रेल्वे प्रशासनाने त्यांना नोटीसही दिलेल्या आहेत. त्यामुळे 116 झोपडीधारक साशंक असून, त्यांनी "आमचेही पुनर्वसन करा,' अशी मागणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. स्थानिक नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासमवेत येथील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले आहे. 

अशा आहेत मागण्या 

  • रेल्वे बाधित पात्र झोपडीधारकांना फोटो पास द्यावेत 
  • रेल्वे बाधितांना फोटोपास देता येत नसल्यास झोपडीधारकांस वैयक्तिक नावाने पात्र असल्याचे पत्र द्यावे 
  • अपात्र झोपडीधारकांकडून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी 
  • कासारवाडीतील सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित जागेवर 116 घरे विकसित करून पुनर्वसन करावे 

रेल्वेमुळे बाधित म्हणतात... 

आम्ही तीस वर्षे झालीत, येथे राहात आहे. माझा जन्मच इथला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य कर आम्ही दरवर्षी भरत आहोत. पावसाळ्यात घरामध्ये पाणी शिरते. त्यावेळी खूप त्रास सहन करावा लागतो. रेल्वेकडून आम्हाला नोटीस आली होती. आम्हालासुद्धा पक्की घरे मिळाली पाहिजेत. 
- गौरी राजपाल, रहिवासी 

आम्हाला लाइट, पाण्याची सुविधा आहे. आम्ही सर्व टॅक्‍सही भरतो आहे. आता फक्त पक्की घरे द्यायला हवीत. गेल्या 35 वर्षांपासून मी येथे राहतो आहे. महापालिकेने आम्हाला पात्र केले आहे. पण, एसआरएने अपात्र ठरविले आहे. सरकारने आमचाही घरासाठी विचार करायला हवा. 
- सखाराम गायकवाड, रहिवासी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rehabilitation of slums in kasarwadi under sra scheme