Valentine Day : कोरोनाच्या निर्बंधामुळे सेलिब्रेशनवर बंधने; अनेकांचा दिवस गाठीभेटींविना सुनासुना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 February 2021

'व्हॅलेंटाइन डे' निमित्त प्रेमीयुगलांच्या उत्कट भावभावनांना घालावा लागला आवर 

पिंपरी : सिनेमागृह सुरू तर चांगला चित्रपट नाही. थिएटरमध्येही मित्र-मैत्रिणीने अंतर सोडून बसायचं. हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही सेलिब्रेशनला परवानगी नाही. कॉलेजला सुटी, त्यात कॅंटीन आणि कट्टाही सुनासुना. अशा सहज भावनिक प्रतिक्रिया तरुणांकडून व्हॅलेंटाइन डे निमित्त कानी पडल्या. त्यामुळे यावर्षी प्रथमच 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त प्रेमीयुगलांच्या उत्कट भावभावनांना आवर घालावा लागला. मित्र-मैत्रिणी, गिफ्ट व गाठीभेटींविना हा दिवस सुनासुना गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात रविवारी (ता. 14) तुरळक ठिकाणी मित्र-मैत्रिणींची हॉटेलमध्ये गर्दी पाहायला मिळाली. बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरच शुभेच्छा संदेश दिले. काहींचे ब्रेकअप झाले त्यांनी देखील एकमेकांना मैत्रीपूर्ण शुभेच्छा संदेश पाठविले. काही जणांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बऱ्याच जणांच्या लॉकडाउननंतर रोजगार व नोकऱ्या गेल्या. त्यामुळे आर्थिक गणिते बिघडली. त्याचेही परिणाम सेलिब्रेशनवर झालेले पहावयास मिळाले. काही जोडप्यांनी आजच्या दिवशी लग्न व साखरपुड्याची गाठ बांधली. जीम आणि डान्स ऍकॅडमीमध्ये सेलिब्रेशनचा जोरदार उत्साह दिसून आला. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी आमच्याकडे व्हॅलेंटाइन डे निमित्त बुकिंग असते. काही कुटुंबे देखील ऍडव्हान्स बुकिंग करतात. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी व स्नेहभोजनाचे आयोजन असते. काही ज्येष्ठ नागरिकही येतात. मात्र, या वर्षी तितकासा प्रतिसाद नाही. शिवाय गर्दी होईल ही भीती आहे. लस टोचून घेतल्याशिवाय पर्याय नाही.
- राहुल गावडे, रागा हॉटेल, चिंचवड  

मॉल आणि कॅफेत बसून देत नाहीत. अद्याप ग्रुपने जाता येत नाही. सॅनिटायझर आणि मास्क असूनही एकत्र जमता येत नाही. दरवर्षी आम्ही चित्रपट पाहायला जातो किंवा मित्र-मैत्रिणी कॅंटिनला भेटतो. पण यावर्षी उत्साह नाही.
- संध्या सोनकांबळे, सदस्य, यीन 

मोबाईलवरून शुभेच्छा संदेश दिले. सोमवारपासून कॉलेज सुरू होणार आहे. मित्र भेटतील याचा आनंद आहे. काही मित्रांनी केले सेलिब्रेशन कॅफेमध्ये. 
- आकाश शिनगारे, सदस्य, यीन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: restrictions on valentine day celebration due to corona