Video : मावळात भात लावणीच्या कामांना वेग; यंदा 'एवढ्या' लागवडीचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

मावळ तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. गरजेच्या वेळी पाऊस सुरु झाल्याने आता रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग येणार आहे. 

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. गरजेच्या वेळी पाऊस सुरु झाल्याने आता रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मावळ तालुक्यात भात हेच खरीपाचे मुख्य पीक असून, कृषी विभागाने यंदा सुमारे तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठरवले आहे. तालुक्यात सुमारे महिन्यापूर्वी चक्रीवादळाच्या परिणामामुळे सर्वदूर पाऊस झाला होता. त्यामुळे भात रोपांची उगवण होण्यास मदत झाली होती. जून महिन्यात तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली. पूर्व भागात मात्र, त्याने अनेक दिवस दडी मारली होती. भात रोपे पिवळी पडू लागली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता.

पाण्याची व्यवस्था असलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी भात लावणीची कामे सुरू केली होती. परंतु, पाण्याची व्यवस्था नसलेले शेतकरी आकाशाला डोळे लावून बसले होते. दररोज पावसाळी वातावरण तयार होऊनही तो पडत नव्हता. एकादशी नंतर पावसाचे आगमन होईल, अशी अटकळ शेतकरी वर्गाने बांधली होती. गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे एका अर्थाने ही अटकळ खरी ठरली आहे. पूर्व भागात भात रोपांच्या वाढीसाठी व पश्चिम भागात रखडलेल्या भात लावणीच्या कामांसाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये व इतर खरीप पिकांसाठी सध्याचा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साथीच्या साक्षीने भात लावणीला सुरुवात

कामशेत : साथीच्या साक्षीने मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात भात लावणीला सुरुवात झाली. विहिर, नदीचे पाणी वापरून काही ठिकाणी लावणी सुरू आहे. ओढ्याच्या लगतच्या शेतात पाणी आहे. पण पावसावरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या लावणीला जोरदार पावसाची गरज आहे. ग्रामीण भागात भात लावणी पूर्वीच्या संध्येला साथ पिटळण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार गावोगावी मंगळवारी किंवा रविवारी साथ होते. बहुतेक गावातील साथी झाल्यावर प्रत्यक्षात भात लावणीला प्रारंभ झाला. साथीला गावातील ग्रामदैवतांना दहीभाताचा किंवा मासांहारी नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. त्यानंतर घरोघरी कोंबडी किंवा बकऱ्याचे मटण शिजवून दुसर्‍या दिवसापासून लावणी केली जाते. मावळाला पावसाचे आगार म्हटले जाते. पश्चिम भागात तीन महिने पावसाची संततधार असते. भात लावणीची कामे महिनाभर चालते. या महिनाभरात गावातील वयोवृद्ध महिला पुरूषांची भेट होत नाही म्हणून लावणीच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची विचारपूस केली जाते. मावळातील खरिपाच्या या लावणीत साथीचे महत्व अजून तरी टिकून आहे.

नाणे मावळात रखडलेल्या भात लागवडीला वेग 

करंजगाव : साथीच्या साक्षीने नाणे मावळात भात लावणीला सुरुवात करण्यात आली. खरिपाचे मुख्य पीक असणाऱ्या भात लावणीला बळीराजाची लगबग सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने रूढ असलेली साथ झाल्याशिवाय भात लावणीला सुरुवात केली जात नाही. नाणे मावळातील काही गावांनी मंगळवारी व रविवारी साथ करून भात लावणीला सुरुवात केली. सध्या समाधानकारक पाऊस पडतो आहे. त्यात शेतकरी पारंपरिक पद्धतीसह आधुनिक पद्धतीने लावणी करीत आहेत. कोळंबा या जून्या भात वाणापेक्षा इंद्रायणी, सोनम, समृद्धी या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. बैलजोडीने लावणीसाठी चिखल करण्याचे प्रमाण कमी झाले असून, यंत्राच्या मदतीने चिखल केली जात आहे. यंत्राच्या मदतीने भात लावणीचे नवे तंत्र शेतकरी स्वीकारत असल्याचे करंजगाव येथील प्रगतशील शेतकरी मंगेश कुढले, बाळासाहेब गायकवाड आदी शेतकऱ्यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'खिलार' गोवंश नामशेष होण्याच्या मार्गावर

शेती क्षेत्रातदेखील यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने बैल जोडी सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. याशिवाय बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेही खिलार बैल सांभाळणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. खिलार बैल हा अधिक चपळ असल्याने त्याची बैलगाडा क्षेत्रात  त्यांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या मात्र शेती व बैलगाडा या दोन्ही क्षेत्रात त्यांची मागणी घटली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rice planting in maval due to rain