
एस. टी. घडवणार साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन
पिंपरी : शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) पिंपरी चिंचवड आगारातून शनिवारी (ता.९)साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता सोडण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन वरीष्ठ लिपिक आर.टी. जाधव यांनी केले आहे.
ही यात्रा चार दिवसांची असून पहिल्या दिवशी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन नागरिकांना मिळणार असून त्याच दिवशी तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन व रात्रीचा मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी माहूरला रेणूका माता दर्शन होईल. याच ठिकाणी दुसरा मुक्काम होईल. तिसऱ्या दिवशी वणी येथील येथील चतु:श्रुंगी देवीचे दर्शन होईल. १२ ऑक्टोबर रोजी रात्री दहा बस पुन्हा आगारात येतील. ‘‘ऑनलाईन बुकींग’ ची सोय उपलब्ध असून एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरुन ‘बुकींग’ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या गाड्यांची ‘बुकींग’ सुरु झाली असून आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले. १० वर्षा आतील मुलांना , तसेच ६५वर्षे पुढील ज्येष्ठ नागरिकांना मंदिर प्रवेश नाही याची नोंद घ्यावी. तसेच वरील भाडे हे फक्त प्रवासभाडे आहे. या प्रवासामध्ये होणार इतर खर्च हा प्रवाशांना वैयक्तिक करावा लागेल. दरम्यान, गतवर्षी वल्लभनगर आगारातून साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ३ विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यामाध्यमातून एस. टी. ला सव्वा दोन लाखांचे उत्पादन मिळाले होते.
असे आहे प्रवासी भाडे
प्रौढ व्यक्ती - 2295 रुपये
लहान मुले - 1150 रुपये
अपंग व्यक्ती - संधी नाही
ज्येष्ठ नागरिक - संधी नाही
अशी करावी नोंदणी
अधिक माहिती साठी आर.टी. जाधव. यांच्या खालील ९८५०९१२४१५ क्रमांकावर संपर्क साधावा. कोविड च्या अनुषंगाने राज्यशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे प्रवाशांना गरजेचे राहील. हे जाहीर असावे. या बस ही आरक्षणासाठी उपलब्ध असून s.t. च्या संकेतस्थळावर आपण आपले सिट आरक्षित करू शकता. आरक्षण हे चिंचवड ते साडेतीन शक्तिपीठ दर्शन असे टाकण्यात यावे. त्यासाठी -cnwd to sddttnकोड आहेत.