Video : पिंपरी-चिंचवडमध्ये सलून सुरू झाले, अशी घेतायेत काळजी

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

  • शहरातील सलून, केशकर्तनालये अखेर सुरु 
  • नाभिक व्यावसायिकांकडून पुरेशी दक्षता 

पिंपरी : शहर परिसरातील सुमारे दोन हजार दुकानांपैकी जवळपास 80 टक्के सलून, केशकर्तनालये अखेर रविवारपासून सुरू झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने अपॉईंटमेट घेऊनच ग्राहकांची कटिंग केली जात आहे. याशिवाय, नाभिक व्यावसायिकांकडून वापरा आणि टाकून द्या प्रकारच्या चादरी, नॅपकीनचाही वापर सुरु करण्यात आला आहे. दुकानाच्या निर्जुंतूकीकरणावरही भर दिला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शहर परिसरातील सुमारे 2 हजार सलून, केशकर्तनालये बंद होती. त्यामुळे नाभिक समाजामध्ये अस्वस्थता होती. मात्र, अखेर हिरवा कंदील मिळाल्यावर सलून, केशकर्तनालये परत सुरु झाली. मात्र, आर्थिक अडचणी, कारागिरांची उपलब्धता नसणे यासारख्या कारणांमुळे जवळपास 20 टक्के दुकाने बंद राहिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अशोक मगर म्हणाले, "आमच्या व्यावसायिकांकडून वापरा आणि टाकून द्या तत्वावरील चादर, नॅपकीन वापरण्यास सुरुवात झाली आहे. मास्क, कॅप, फेसशिल्ड, हॅंड ग्लोव्हज्‌ यासारख्या सुरक्षा साधनांचा वापर केला जात आहे. जंतुनाशकांची फवारणी आणि कटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. मात्र, त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. साफसफाईचेही काम करावे लागत आहे. पहिल्या दिवशी रविवारी ग्राहकांची गर्दी राहिली नाही. ग्राहकांची एकाचवेळेस गर्दी होऊ नये म्हणून त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद वहीत ठेवली जात आहे. त्यानुसार त्यांना कटिंगसाठी बोलविले जात आहे.'' 
थेरगाव येथील व्यावसायिक यशवंत आपुणे म्हणाले, "आम्ही स्वतःची आणि ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. प्रत्येक ग्राहक गेल्यावर खुर्ची आणि दुकानाचे निर्जंतुकीकरण करत आहोत. एकावेळेस एकच ग्राहक दुकानात घेऊन दुसऱ्या ग्राहकाला प्रतिक्षा करण्यास सांगितले जात आहे.'' 

वाढीव दराची आकारणी! 

नाभिक महामंडळाने दुकाने सुरू होण्यापूर्वी कटिंगसाठी 100 रुपये दराच्या आकारणीची घोषणा केली होती. मात्र, काही व्यावसायिकांनी वाढीव खर्चाचे कारण देत कटिंगसाठी 120 रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. तर एसी दुकानांतील कटिंगचे दर आणखी जास्त म्हणजे 175 रुपयांपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे. जागेचे भाडे थकले आहे. जागामालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही, हे कारण त्यामागे दिले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saloon started in Pimpri-Chinchwad