
गेली दोन वर्षांपासून कोरोनामुळे महामारिच्या संकटामुळे सण उत्सव नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने साजरे करता आले नाहीत.
ढोल बजने लगा! सांगवीत माजी नगरसेवकांनी घेतला ढोल वादनाचा आनंद
जुनी सांगवी - गेली दोन वर्षांपासून कोरोनामुळे महामारिच्या संकटामुळे सण उत्सव नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने साजरे करता आले नाहीत. सबंध महाराष्ट्रासह पुणे- पिंपरी-चिंचवड शहराचा गणपती उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. जुलै महिन्यांपासूनच गणपती उत्सवाचे तरूणाईसह भाविक भक्तांना वेध लागलेले असतात. सजावट, आरास, रोषणाई यासाठी मित्र मंडळांचा खटाटोप सुरू होतो. याचबरोबर गेली दोन वर्षांपासून ढोल ताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूका न झाल्याने कोरोनामुळे गणपती उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या ढोल ताशा पथकांचा हिरमोड झाला होता. कोरोनाचे संकट ओळखून या काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक मंडळांनी रक्तदान शिबिर, मास्क वाटप, आरोग्य शिबीर, अन्नदान अशा सामाजिक सेवा कार्यात सहभाग घेतला होता. यावर्षी सण उत्सवावरिल निर्बंध हटल्याने ढोल ताशा पथके गणपती उत्सवासासाठी सज्ज झाली आहेत.
उपनगरात ठिक ठिकाणी वाद्यपुजन करून नव्या जुन्या वादक तरुणांना घेऊन ढोल ताशा पथके वादन सरावाची सुरूवात करत आहेत. जुनी सांगवी येथील मल्हार ढोल ताशा पथकाचे वाद्यपुजन करून माजी नगरसेवक तथा चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी नगरसेवक संतोष कांबळे यांनी ढोल वादनाचा आनंद घेतला.परिसरातील ढोल ताशा पथकांना कला वादनाबरोबरच या पथकांना मानधन स्वरूपात चांगले अर्थार्जन मिळते. यामुळे तरूणांचा या सांघिक वाद्यवादनासाठी मोठा ओढा असतो.
सांगवी, नवी सांगवी, दापोडी परिसरात नामवंत ढोल ताशा पथके आहेत यात जुनी सांगवी तील सुवर्ण युग पथक, मल्हार, शिवशक्ती व्यायाम मंडळ, सामर्थ्य, स्वराज्य, वादक, गणेशा अशी प्रमुख नावे आहेत. ही मंडळी शहरासह महाराष्ट्राच्या विविध भागांत जाऊन गणपती उत्सवात वादन करतात. गेल्या दोन वर्षापासून कोरोना सावट असल्यामुळे गणेश उत्सवात ढोल ताशा पथकांचा आवाज कानावर पडला नव्हता. परंतु, यावर्षी निर्बंध मुक्त गणेश उत्सव सण साजरा करण्यात येणार असल्याने ढोल ताशा पथकात उत्साहाचे वातावरण आहे. तर यंदा नव्या उमेदीने ढोल ताशा पथकातील मुले सरावात सहभागी होत आहेत. कोरोनामुळे सामाजिक कार्यात सहभाग घेत गरजूंना मदत केली होती. परंतु उत्सवात पथक नसल्याने तरुणाईचा हिरमोड झाला होता. यावर्षी अनेक नवीन पथकांची ही स्थापना करण्यात येत आहेत.
Web Title: Sangavi Dhol Tasha Former Corporator
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..