सॅनिटायजर कोरोनापासून सुरक्षा देतंय पण 'या' धोक्याचं काय?

sanitizer
sanitizer

पिंपरी, ता.24 ः कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना सॅनिटायजरला मागणीही कायम आहे. मात्र, औषधांच्या दुकानांमधील अल्कोहोलयुक्त सॅनिटायजरच्या साठ्याच्या सुरक्षा उपायांबद्दल पुरेसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. अनेक दुकानांमध्ये आग प्रतिबंधात्मक साधनांचा अभाव दिसत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून शहर परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे, औषधे दुकानांमधून मास्क, सॅनिटायजर यांची नागरिकांकडून मागणी चालू आहे. त्यामुळे, दुकानदारांनी विविध प्रकारच्या ब्रॅन्डचे सॅनिटायजर विक्रीसाठी ठेवले आहेत. त्यामध्ये, 200 मिलीलिटर, 500 मिलीलिटर पासून 5 लिटर्स पर्यंतचेही सॅनिटायजरच्या कॅनचा समावेश आहे. 

सॅनिटायजरमध्ये 80 ते 99 टक्के अल्कोहोल असते. अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे, त्याबद्दल, विशेष खबरदारी घेणे गरजेचे ठरले आहे. चिंचवड घाऊक औषधे विक्रेता संघाचे अध्यक्ष संतोष खिंवसरा म्हणाले,""काही ऍलोपॅथिक औषधे उत्पादक कंपन्यांनी देखील सॅनिटायजरची निर्मिती चालू केली आहे. औषधे दुकानांमधून अन्न व औषधे प्रशासना (एफडीए)कडील मान्यताप्राप्त आणि प्रमाणित सॅनिटायजरची विक्री केली जात आहे. "एफडीए'ने त्याबाबत आम्हाला सुरक्षा विषयक सूचनाही कळविल्या आहेत. त्यानुसार, दुकानाच्या काऊंटरजवळ किंवा जिथे उष्णता अधिक आहे अशा ठिकाणी सॅनिटाजर ठेवू नये, थंड ठिकाणी त्याचा साठा ठेवावा. लहान मुलांना देऊ नये आदी सूचनांचा समावेश आहे. त्यानुसार, आम्ही त्याचे पालन करत आहोत.'' 

महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे म्हणाले,""सॅनिटायजर हे ज्वलनशील आहे. मात्र, औषधे दुकानांमधील सॅनिटायजरच्या साठ्याबद्दल मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. त्याबद्दल, सुरक्षा विषयक सूचना देण्याचे अधिकार अन्न व औषधे प्रशासनाच्या अख्त्यारित येतात. दुकानदारांनी त्या आदेशानुसार कार्यवाही केली पाहिजे.'' 

काही कंपन्यांनी सुगंधीत प्रकारातही सॅनिटायजरची निर्मिती केली आहे. 5 लिटर्स कॅनची किंमत 800 ते 1 हजार रुपये, 100 मिलीलिटरच्या बाटलीची किंमत 80 रुपयांपासून पुढे आहे. 

किरकोळ दुकानदार सुरक्षेबद्दल अनभिज्ञ ! 
बहुसंख्य किरकोळ औषधे दुकानदार सॅनिटायजरपासून होणाऱ्या संभाव्य धोक्‍याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे, त्यांच्या दुकानांमधून अग्नि प्रतिबंधात्मक साधनेही दिसून येत नाहीत. अन्न व औषधे प्रशासनाकडून सुरक्षाविषयक कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे जुनी सांगवी येथील औषधे विक्रेत्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com