esakal | ‘सेवा विकास’बँक वाचविण्यासाठी खातेदारांची विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

seva vikas bank

‘सेवा विकास’बँक वाचविण्यासाठी खातेदारांची विनंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड : गेल्या ३० वर्षांपासून बँकेसोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. असंख्य सुखदुःखात बँकेने आमची खंबीर साथ दिली. भक्कम आर्थिक पाठबळ देत आमचे प्रपंच, उद्योग, व्यवसाय उभे करून स्थिरस्थावर केले. जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या सेवा विकास बँकेला काहीही करून वाचवा अशी एकमुखी विनवणी सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांना खातेदार-ठेवीदारांनी केली.

सेवा विकास बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्यामुळे बँकेवर आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथे सहकार भारतीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहकार भारतीचे पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्ष डी. के. जाधव, समन्वयक संजय कुलकर्णी यांच्यासह अनेक खातेदार, शेअर होल्डर, ठेवीदार आदी उपस्थित होते.

काही धनदांडग्यांनी कर्ज बुडविल्यामुळे बँकेची स्थिती खराब झाली. या कर्ज बुडव्यांच्या दहशतीखाली अनेकजण आहेत. ठेवीदारांना प्रती महिना २० हजार देण्याचे ठरले असताना काहींना मोठ्या रकमा देण्यात आल्या. सर्वसामान्य खातेदार मात्र कष्टाचे पैसे घेण्यासाठी झगडतोय, प्रामाणिक कर्ज फेडलेल्या अनेकांना पुन्हा नोटिसा आल्यात, व्याजदर वाढविण्यात आला सध्या बँकेत व्यवहार व चेक क्लिअरिंग बंद आहेत अशा अनेक समस्या मांडण्यात आल्या.

सर्वसामान्य खातेदारांना ही बँक सहकार्य करायची. दुसऱ्या खासगी बँकेत खाते उघडल्यास त्यांचे अवास्तव चार्ज परवडणारे नाहीत. बँक पूर्ववत होऊन, सुरळीत चालावी यासाठी सहकार भारतीने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले. सहकार भारतीचे राष्ट्रीय पदाधिकारी व संरक्षक सतीश मराठे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांची एक समिती स्थापन करून त्यामार्फत केंद्रीय अर्थमंत्री तसेच आरबीआयकडे समस्या मांडू त्याचप्रमाणे पाठपुरावा करत सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन जाधव व कुलकर्णी यांनी दिले.

loading image
go to top