esakal | शालेय गणवेश विक्रीअभावी पडून; व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

School Dress Uniform

शालेय गणवेश विक्रीअभावी पडून; व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - यंदाही शाळा (School) सुरू होण्यासारखी परिस्थिती दिसत नाही. ऑनलाइन शिक्षणावरच (Online Education) भर राहणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेश (Uniform) उद्योगाला (Business) मोठा आर्थिक फटका (Economic Loss) बसणार आहे. १५ महिने दुकान बंद असल्याने शहरात सुमारे आठ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. (School Uniforms Fail to Sell Billions of Rupees Lost to Professionals)

कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाउनमुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांतर्फे सांगितले जात आहे. मुलांवर तिचा परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत यंदाही शाळा सुरू होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. ऑनलाइन शिक्षणावरच शाळांचा भर असणार आहे. याचा फटका शालेय गणवेश व्यापाऱ्यांना बसला आहे. शहरात शालेय गणवेशाचे छोटे-मोठे १५ वितरक आहेत. शहरातील सुमारे २०० शाळांकडून गणवेशांची मागणी असते.

हेही वाचा: वय अवघे 2 वर्ष; अंक, प्राणी-पक्षी, कविता, नेते सगळं तोंडपाठ

नवीन शैक्षणिक वर्षासाठी गणवेशांची मागणीची सुरुवात जानेवारी-फेब्रुवारीपासूनच सुरू होते. गणवेश बदलणार असेल, तर शाळा व्यवस्थापन फेब्रुवारीतच त्याची सूचना वितरकांना देतात. त्यानुसार गणवेशांची तयारी सुरू होते. अनेक कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणवेश ठोकमध्ये खरेदी केले जातात. त्याकरिता गणवेश तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांना कॉन्ट्रक्ट देण्यात येते. त्यामुळे व्यावसायिकांना लाखोंचा फायदा होतो. मात्र, यावर्षी कॉन्ट्रक्ट न दिल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वर्षभरातून दोनदा स्काऊट-गाइड ड्रेस, पीटी युनिफॉर्म, टीशर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्कर्ट याची खरेदी होत असते. त्यातूनच ४० लाख ते एक कोटीचा व्यवसाय मिळतो.

गेल्या वर्षाचा साठा पडून

गेल्यावर्षी लॉकडाउन सुरू झाले, तेव्हा शहरातील वितरकांकडे ऑर्डरनुसार ५० टक्के सुमारे १५ कोटींचे गणवेश दाखल झाले होते. लॉकडाउन व ऑनलाइन शाळांमुळे गणवेश विक्री झाली नाही. डिसेंबर-जानेवारीत नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले होते. पण, आठवड्याभरात तेही बंद झाले. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता, यंदा वितरकांनी नवीन गणवेश मागविण्याचे धाडस केले नाही. मागील वर्षाचा साठा अजून पडून आहे. शहरात पाच ते आठ कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती गणवेश व्यापारी रतन कटारिया यांनी दिली.

loading image