पिंपरी-चिंचवडमध्ये किती विद्यार्थी ऑनलाइन शिकतायेत? हे शिक्षण विभागाला माहितीच नाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात किती विद्यार्थी 'ऑनलाइन' शिकत आहेत? किती विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्राईड मोबाईल आहे? याची माहितीच या विभागाकडे उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

पिंपरी : महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात किती विद्यार्थी 'ऑनलाइन' शिकत आहेत? किती विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्राईड मोबाईल आहे? याची माहितीच या विभागाकडे उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ऑनलाइन शिक्षणाची माहिती हवी असल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांचे मोबाईल क्रमांक दिले जातील, त्यावर संपर्क करून माहिती घेऊ शकता, असा सल्ला या विभागातील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. यावरून माध्यमिकचे किती विद्यार्थी 'ऑनलाइन' धडे गिरवत असल्याची माहिती मिळणे अवघड झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शाळा बंद असल्याने सगळीकडेच 'ऑनलाइन स्टडी' या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. शिक्षक 'मीट ऍप', 'गूगल मीट' किंवा 'झूम'द्वारे मुलांचे शैक्षणिक वर्ग घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा नेटची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मोबाईल उपलब्धतेनुसार ऑफलाइन किंवा व्हॉट्‌सऍपचा वापर करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या अठरा शाळांची सध्याची ऑनलाइनची काय स्थिती आहे? ऑनलाइन शिक्षण वर्ग सुरू आहेत का? आणि किती विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, याचीच माहिती सध्या या विभागाकडे उपलब्ध नाही. माध्यमिक विभाग ऑनलाइन शिक्षणाची माहिती हवी असल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांचे क्रमांक दिले जातील. त्यावर संपर्क करून माहिती घेऊ शकता, असा सल्ला माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. या विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांच्याकडे प्रभारी पदभार असल्याने त्यांच्या खांद्यावर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचा भार असल्याने 'माध्यमिक'चे प्रश्‍न 'जैसे थे' राहत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विभागाकडे सध्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाची माहितीच नसेल तर त्यांच्या अडचणी कशा सोडविल्या जातील. महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मोबाईल देण्यास सक्षम नसतील तर त्या मुलांच्या शिक्षणाचे काय? अडचणीवर उपाय कसे करणार? याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. मात्र त्याचे नियोजनच या विभागाकडे नसल्याने विद्यार्थी शिक्षण कसे घेणार? या विभागाचे या विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे किती दुर्लक्ष आहे यातून स्पष्ट होते. या बाबत माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी पराग मुंढे म्हणाले, "मुख्याध्यापकांकडून माहिती घेऊन सांगावे लागेल.'' 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: secondary department has no information about the students studying online at pimpri chinchwad