नोकरी गेल्यावर उघडला कॅफे; 'चालता बोलता चहा'तून महिन्याला कमावतो 50 हजार

टीम ई सकाळ
Friday, 8 January 2021

सुरक्षा रक्षकाची नोकरी गेल्यावर काहीच काम मिळत नव्हतं. त्यातच लॉकडाऊन झालं आणि सगळं चक्रच थांबलं. तेव्हा कॅफे 18 नावाने दुकान सुरू केलं.

पिंपरी - लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे प्रचंड हाल झाले. कंपन्यांनी नोकर कपात केल्यानं बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. तर आधीच बेरोजगार असलेल्यांची अवस्था बिकट झाली. एका कंपनीत सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या तरुणाची 2019 मध्ये नोकरी गेली होती. 

नोकरी शोधत असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झालं त्यामुळे शोध थांबला. हातावरचं पोट काहीच काम नसल्याने खाण्या पिण्याचे हाल सुरू झाले. अशा परिस्थितीत काय करायचं याचा विचार करताना त्याने किमान घरखर्च भागेल म्हणून चहाचं दुकान सुरू केलं. त्याची आता महिन्याची कमाई थक्क करणारी अशी आहे. 

पिंपरी चिंचवडमधला रेवन शिंदे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. नोकरी गेल्यावर काहीच काम मिळत नव्हतं. त्यातच लॉकडाऊन झालं आणि सगळं चक्रच थांबलं. तेव्हा कॅफे 18 नावाने दुकान सुरू केलं. कसा प्रतिसाद मिळेल याची कल्पना त्याला नव्हती. मात्र आता दिवसाला 600 ते 700 कप चहा विकतात. यातून महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळले. कॉर्पोरेट ऑफिस आणि इंडस्ट्रियल वर्कर्सनासुद्धा ते चहा विकतात. 

हे वाचा - 7 अ‍ॅप्संना चुकूनही करु नका डाऊनलोड; अन्यथा मिनिटात अकाऊंट होईल रिकामं

कोरोनाच्या संकटकाळात लोक हॉटेलमध्ये येणं टाळत होते. त्यामुळे व्यवसाय कसा चालणार हासुद्धा प्रश्नच होता. ज्यावेळी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली तेव्हा ऑफिसला जाणाऱ्या लोकांना चहा मिळत नव्हता. तेव्हा या कर्मचाऱ्यांना मोफत चहा, कॉफी दिली. त्यांचा प्रतिसादही चांगला मिळाला आणि आता खपही असल्याचं रेवन यांनी सांगितलं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: security guard in Pune turns entrepreneur after losing job