Pimpri : इच्छुकांकडून उमेदवारीची स्वयंघोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

इच्छुकांकडून उमेदवारीची स्वयंघोषणा

पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोगाकडून हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानुसार राजकीय पक्ष आपापले उमेदवार ठरवतील. या प्रक्रियेला किमान महिनाभराचा कालावधी लागू शकतो. मात्र, त्यापूर्वीच इच्छुकांनी स्वतःच उमेदवारीची घोषणा करून बॅनरबाजी सुरू केली आहे. त्यावर स्वतःच्या नावासह पक्षाचे चिन्ह वापरत मत देण्याबाबतचे भावनिक आवाहनही केले आहे. त्यामुळे एकप्रकारे निवडणुकीचा प्रचारच सुरू झाला आहे.

महापालिकेची पंचवार्षिक मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय, राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार, आगामी काळात सध्याच्या १२८ ऐवजी १३९ नगरसदस्य महापालिकेत असतील. कारण, सरकारने १२ लाखांसाठी १२६ नगरसदस्य आणि त्यापुढील प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एक सदस्य या प्रमाणात नगरसदस्यसंख्या निश्चित केली आहे.

त्यामुळे शहराच्या लोकसंख्येनुसार ११ सदस्य वाढणार आहेत. त्यासाठी शहरात तीन सदस्यांचे ४५ आणि चार सदस्यांचा एक असे ४६ प्रभाग केले जाणार आहेत. त्यांचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २५ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. त्याबाबतचा गोपनीय अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच काही इच्छुकांनी संपर्क कार्यालये सुरू करून, होर्डिंग व बॅनर्स लावले आहेत.

काहींनी रिक्षांवर बॅनर्स लावून प्रचार सुरू केला आहे. त्यांवर संबंधित पक्षांचा ध्वज व चिन्हही नमूद केले आहेत. काहींनी मात्र, निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवावी, याबाबत गोंधळ असल्याने पक्षाचे ध्वज व चिन्ह टाळून केवळ स्वतःचे नाव व छायाचित्र वापरून मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराची वातावरण निर्मिती बघायला मिळत आहे.

असे आहे आवाहन

‘आता साथ विकासाला’, ‘...ला साथ द्या’, ‘आपला भावी नगरसेवक वा नगरसेविका’, ‘आवाज फक्त... चा’, ‘महापालिकेत फक्त.... च’, ‘आमचा पक्ष, आमचा नेता,’ ‘... च्या सोबत ....ला साथ द्या’ अशा स्वरूपाचे भावनिक आवाहन केले जात आहे. त्यासाठी इच्छुकांनी स्वतःच्या नावासह टोपणनावांचाही वापर केला आहे. यात ‘दादा’, ‘भाऊ’, ‘तात्या’, ‘अण्णा’, ‘अप्पा’, ‘बापू’, ‘ताई’, ‘अक्का’, ‘नानी’, ‘माई’ आदींचा समावेश आहे.

loading image
go to top