पिंपरीमध्ये ‘बी’, ‘एबी’ रक्तगटाचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

blood
पिंपरीमध्ये ‘बी’, ‘एबी’ रक्तगटाचा तुटवडा

पिंपरीमध्ये ‘बी’, ‘एबी’ रक्तगटाचा तुटवडा

पिंपरी : लसीकरणानंतर रक्तदानाचे प्रमाण घटले असून, दिवाळीमुळे विद्यार्थी, कामगार, नोकरदार गावी गेल्याने शहरात ‘बी’ आणि ‘एबी’ रक्तगटाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अवघे दोन दिवसच पुरेल एवढाच रक्ताचा साठा रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक आहे.

शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सद्यःस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत दिवसाला ४० ते ५० रक्ताच्या पिशव्यांची मागणी आहे. तर दिवसाला १० ते १५ दाते रक्तदान करण्यासाठी येत असल्याची स्थिती आहे. डेंगीचे वाढलेले रुग्ण, त्यासाठी उपयुक्त प्लेटलेट्समुळे रक्ताची मागणी वाढल्याचे निरीक्षण रक्तपेढ्यांनी नोंदविले आहे. डेंगीचे रुग्ण वाढल्याने प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. शहरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढ्यांकडून रक्तातील विविध घटकांची देवाण-घेवाण होत होती. गरजूंना वेळोवेळी रक्त मिळत होते. मात्र, रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने ही देवाणघेवाणही थांबली आहे.

दिवाळीमुळे रक्तदान शिबिरांमध्ये खंड पडला. लसीकरणानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. पण, आता रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नाहीत. लसीकरण, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे नागरिक रक्तदान करीत नाहीत. शहरातील रुग्णालयांमध्ये यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपण वाढत असून, त्यासाठी एका रुग्णांसाठी २० पिशव्यांची गरज भासते. दोन वर्षांपासून शहरात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक आयटी कंपन्यांचे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे बंद झाली आहेत. शहरात एक ते दोन दिवसांचाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई आहे. रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे नातेवाईक वाद घालतात. रक्तदान झाल्याशिवाय रक्त उपलब्ध होऊच शकत नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे.

loading image
go to top