पैशांची चणचण होती म्हणून त्यानं छापल्या सहा लाखांच्या नोटा अन्...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

- बनावट नोटा छपाई प्रकरणी सात जणांचे टोळके अटकेत

पिंपरी : कर्ज फेडायचं होत, त्यात लॉकडाउनमुळं हातात पैसा नव्हता. त्यामुळं टोळक्यानं चक्क बनावट नोटा छपाईचा प्लॅन केला. अनेक वर्षे प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या दहावी नापास तरुणाच्या मदतीनं साध्या कागदाचा वापर करीत हुबेहूब दोन हजाराच्या सहा लाखांच्या नोटा छापल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आलाय. या आरोपीकडून प्रिंटर, रंग, स्कॅनर, कागद व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी अभिषेक प्रदीप कटारिया (वय 19, रा. आनंद पार्क, थेरगाव) , ओंकार शशिकांत जाधव (वय 19, केशवनगर, चिंचवड), सुरेश भगवान पाटोळे (वय 40, रा. पाटे वस्ती, फुगेवाडी ), प्रमोद अमृत गायकवाड (वय 33, ज्ञानेश पार्क, नवी सांगवी) अख्तर इकबाल अकबर मिर्झा (वय 57, रा. हजार खोली, पहिली लाईन, मालेगाव, जि. नाशिक), खलीलअहमद अब्दुलहमीद अन्सारी (वय 40, रा. भारत बेकरी गल्ली, भारतनगर, मुंबई), नयूम रहीमसाहेब पठाण (वय 33, रा. यशदा राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, औंध) यांना अटक केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्सारी याचा मुंबईत गारमेंटचा व्यवसाय असून, त्याच्यावर कर्ज झालं होतं. गायकवाडशी त्याची ओळख होती. हातात पैसा नसल्याने बनावट नोटा छपाईचा प्लॅन झाला. अशातच मिर्झाही त्यांना भेटला. मिर्झा दहावी नापास असला, तरी प्रिंटींग प्रेसमध्ये काम करण्यात तरबेज आहे. त्याच्या कौशल्याचा फायदा घेत बनावट नोटा छापायचं निश्चित झालं. दरम्यान, आरोपी व पाटोळे याची ओळख असल्यानं आरोपींनी पाटोळेलाही सोबत घेतलं. लॉकडाऊनमुळे सर्वांनाच पैशांची गरज असल्यानं त्यांनी पाटोळेच्या चिखलीतील घरात बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिर्झा अनेक वर्षे एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असल्याने कोणाला संशयही येणार नाही, अशा हुबेहुब दोन हजाराच्या नोटा छापल्या. यातील तीन लाखांच्या बनावट नोटा आरोपींनी कटारिया याला दिल्या. याबाबतची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाल्यानं पोलिसांनी कटारिया याच्यासह ओंकार जाधव याला आकुर्डीतून अटक केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, छापलेल्या नोटा चलनात आणल्याप्रकरणी नयुम पठाणही सापडला. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश आहे का, याचा शोध पिंपरी पोलिस घेत आहेत. 

दोन लाखांच्या नोटा फाडल्या

छापलेल्या काही नोटांवर रंग पसरल्याने त्या चलनात आणल्या नाहीत. खराब झालेल्या दोन लाखांच्या नोटा आरोपींनी फाडल्या. तर एक लाखांच्या नोटा एकाला दिल्या असून, तो दुसऱ्या गुन्ह्यात सध्या कारागृहात आहे. 

...अन् 'तो' देणार होता चलनातील दीड लाख

अभिषेक कटारिया याने एकाकडून घेतलेले पैसे देण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्यानं आरोपींकडून तीन लाखांच्या बनावट नोटा घेतल्या. या नोटा मार्केटमध्ये चालवून त्या बदल्यात आरोपींना त्याने चलनातील दीड लाख रुपये देण्याची बोली केली होती. मात्र, त्यापूर्वीच कटारिया व जाधव पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

येथे सुरू होता नोटा छपाईचा उद्योग 

सुरेश पाटोळे हा सुरक्षराक्षकाचे काम करायचा. मात्र, सध्या लोकडाऊनमुळं काम नसल्यानं पैशांचीही चणचण होती. त्यामुळं बनावट नोटांच्या प्रकरणात तोही सामील झाला. चिखलीतील घरकुलमध्ये त्याचं घर आहे. याच ठिकाणी लॉकडाउनच्या कालावधीत बनावट नोटा छपाईचा उद्योग सुरू होता. येथून पोलिसांनी प्रिंटर, नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा साधा कागद, रंग, स्कॅनर आदी साहित्य जप्त केलंय.

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six lakh notes printed by 10th failed boy in gharkul chikhali pimpri chinchwad