esakal | पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणात सोसायट्या आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणात सोसायट्या आघाडीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून महापालिकेने सोसायटी स्तरावर लसीकरण सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या आठ दिवसांत २९ सोसायट्यांमधील चार हजार ८३५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. मात्र, शहराच्या एकूण लसीकरणात पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. त्यामुळे दुसरा डोस राहिलेल्यांवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले असून, लसीकरणाचे नियोजन क्षेत्रीय कार्यालय स्तरांवर केले आहे.

शहरातील झोपडपट्टी परिसर, गृहनिर्माण सोसायट्या, ज्येष्ठ नागरिक आणि दुसरा डोस राहिलेले नागरिक अशी वर्गवारी करून लसीकरण सुरू केले आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय स्तरांवर ही पथके कार्यरत आहेत. तसेच, लसीकरण कुठे, कसे व कोणत्या सोसायटीत करायचे, याचे दैनंदिन नियोजनही क्षेत्रीय अधिकारी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या पातळीवर केले जात आहे. आठ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील आठ रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले जात आहे. सरकारसह काही कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतूनही (सीएसआर) महापालिकेकडे लस उपलब्ध झाल्या आहेत. दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा अधिक डोस उपलब्ध होत आहेत. यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लशीचा समावेश आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम १६ जानेवारीपासून सुरू आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोफत लसीकरण सत्र आयोजित केले जात आहे. सोसायट्यांमधील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. ’’

- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

शंभरपेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या सोसायट्यांमध्ये लसीकरण केले जात होते. आता त्यापेक्षा कमी लाभार्थींच्या सोसायट्या व त्यांच्या परिसरातही शिबिर भरवून गणेश मंडळे व सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून मनुष्यबळ व पायाभूत साहित्य दिले जाते. ज्येष्ठ वैद्यकीय अधिऱ्यांच्या नियंत्रणाखाली लसीकरणाचे नियोजन केले जाते.’’

- सोनम देशमुख, क्षेत्रीय अधिकारी, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, प्राधिकरण

महापालिकेतर्फे चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिर आयोजित केले जात आहे. चिखली येथील क्रिस्टल सिटी सोसायटीत नुकतेच शिबिर झाले. परिसरातील सात सोसायट्यांमधील ४५७ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यासाठी फेडरेशनने जनजागृती केली होती.

- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी हाउसिंग सोसायटी फेडरेशन

loading image
go to top