'बांधकाम कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावा', कष्टकरी महासंघाची बच्चू कडू यांच्याकडे मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री बच्चू कडू यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली. 

पिंपरी : राज्यातील बांधकाम कामगारांची परिस्थिती बिकट असून, त्यांच्या विविध प्रश्‍नांकडे लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना कालावधीमधील दोन व तीन हजार रुपयांचे अनुदान अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेले नाही. नूतनीकरण, शिष्यवृत्ती, प्रलंबित लाभ, नोंदणीसह विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री बच्चू कडू यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, प्रसिद्धीप्रमुख उमेश डोर्ले, विजय तापकीर, शिवाजी लांडगे, भास्कर राठोड, सुखदेव कांबळे आदी उपस्थित होते. 

नखाते म्हणाले, की राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनमधील लाभ म्हणून बारा लाख कामगारांना लाभ दिल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात अनेकांना लाभ दिला नाही. आकडेवारी लपविण्यात येत आहे. नोंदणीचे काम प्रलंबित असून, नोंदणी होत नाही. त्याचबरोबर नूतनीकरण ऑनलाइन पद्धतीने करायचे की ऑफलाइन पद्धतीने करायचे, यावरच प्रशासनाचा सावळागोंधळ सुरू आहे. यामध्ये अनेक बांधकाम कामगारांचे विविध कामे रखडली आहेत. त्यांना मिळणारे पाच हजार रुपयांचा लाभसुद्धा रद्द केलेला आहे. तो नव्याने पुन्हा सुरू करून त्याची रक्कम दहा हजार रुपये पर्यंत करावे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

त्याचबरोबर सुरक्षा साधनांचे वाटपाची प्रक्रिया पुन्हा जलद गतीने सुरू करावी. तसेच, नूतनीकरण न झाल्यामुळे अनेक कामगारांना विविध लाभ मिळत नाहीत. ते लाभ मिळण्यासाठी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. याशिवाय नूतनीकरणासाठी जाचक अटी रद्द कराव्यात, अशा आदी मागण्याचे निवेदन कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे देण्यात आले. यावेळी संबंधित विभागास आदेश देऊन याबाबत आपण योग्य ती कारवाई करू, असे आश्‍वासन राज्यमंत्री कडू यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solve problem of construction workers demand of kashtakari mahasangh to minister bachchu kadu