क्रीडा खात्याचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

- जुलै 1970 मध्ये झाली स्थापना 

पिंपरी : शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून खुल्या गटातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेण्यात मदतीचा हात देणाऱ्या राज्याचे क्रीडा खाते सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. पुण्यातील मध्यवर्ती इमारतीत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय सुरू झाले. या खात्याचे तेथे अजूनही काही अंशी कामकाज चालते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सध्या राज्य क्रीडा व युवक संचालनालयाचे बहुतांश कामकाज बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात चालत आहे. मात्र, पुणे कॅम्प परिसरातील मध्यवर्ती इमारतीत कार्यालय सुरू झाल्यापासून आजतागायत क्रीडा खात्याने एखाद्या कात टाकली आहे. विविध प्रकारच्या आव्हानांना खाते सामोरे गेले. त्याच्या प्रवासाच्या आठवणी खात्याचे आजी-माजी अधिकारी आणि राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने जागविल्या. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर म्हणाले, "क्रीडा खात्याचा पूर्वी शिक्षण खात्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला होता. मात्र, 3 जुलै 1970 मध्ये खात्याची स्वतंत्र स्थापना झाली. तत्कालीन वित्तमंत्री शेषराव वानखेडे यांच्याकडे क्रीडा खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. भाऊसाहेब वर्तक, मधुकरराव चौधरी, सुंदरराव सोळंकी, अनंतराम नामजोशी आदींसह काही काळ तत्कालीन गृहराज्यमंत्री शरद पवार यांनीही क्रीडा खात्याची धुरा संभाळली. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना अरुण दिवेकर यांना खात्याची पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली. 1970 मध्ये तत्कालीन सचिव रा. गो. साळवी यांच्याकडे क्रीडा खाते होते. पहिले क्रीडा संचालक म्हणून दि. गो. वाखारकर यांनी काम पाहिले. क्रीडा क्षेत्राचा व्याप वाढत गेल्यावर क्रीडा आयुक्त हे पद निर्माण झाले.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे म्हणाले, "केंद्र सरकारने त्याकाळी राष्ट्रीय सुरक्षा दल नावाने योजना आणली होती. कालांतराने त्यातील मनुष्यबळ प्रत्येक राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आले. क्रीडा खात्याचा कारभार सुरुवातीला खूप छोटा होता. मनुष्यबळ आणि त्याचे बजेटही कमी होते. मात्र, हळूहळू त्याचे बजेट वाढत गेले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यापासून खात्याच्या विविध योजना आणि कामकाजाला गती येण्यास सुरुवात झाली. प्रत्येक तालुका, विभाग आणि जिल्हा स्तरावर क्रीडा संकुले सुरु झाली. पुण्यातील मध्यवर्ती इमारतीतील क्रीडा खात्याचे कार्यालय खेळाडू, क्रीडा संघटनांसमवेत सुसंवाद रहावा आणि प्रशासकीय सोयीच्यादृष्टीने पुढे बालेवाडी येथे स्थलांतरीत झाले. मात्र, अजूनही खात्याचे काही अंशी कामकाज मध्यवर्ती इमारतीमधून चालते.'' 

"राज्याच्या क्रीडा खात्याची स्थापना 1970 मध्ये झाली. मात्र, त्याचे कामकाज प्रत्यक्षात 72 पासून नियमितपणे सुरु झाले. आमच्या खात्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करायचा होता. परंतु, सध्याच्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे शक्‍य होत नाही. मात्र, पुढील वर्षी नक्कीच सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करता येईल, अशी आशा वाटते.'' 
- विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports Department debuts in golden jubilee year