esakal | केवळ एका मार्काची लाखाला हूल
sakal

बोलून बातमी शोधा

Manisha-Vaishnavi

घरच्या गरिबीमुळे महापालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या मनीषाने पहिलीपासून परीक्षेत कधी पहिला नंबर सोडला नाही. यंदाही ती दहावीत झळकणार, लाखाच्या बक्षिसाची धनी होणार, असे सगळे जण पैंजेवर सांगत होते; पण अवघ्या एका मार्काने लाखाला हुलकावणी दिली.

केवळ एका मार्काची लाखाला हूल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी पालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीचे बक्षीस हुकले
पिंपरी - घरच्या गरिबीमुळे महापालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या मनीषाने पहिलीपासून परीक्षेत कधी पहिला नंबर सोडला नाही. यंदाही ती दहावीत झळकणार, लाखाच्या बक्षिसाची धनी होणार, असे सगळे जण पैंजेवर सांगत होते; पण अवघ्या एका मार्काने लाखाला हुलकावणी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जणू मार्कानेही गरिबीची परीक्षा घ्यावी, असा हा प्रसंग. याच प्रसंगाची वाटेकरी ठरलेली मनीषा वाघमारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेत शिकते. दहावीच्या परीक्षेत तिला ८९.६० टक्के गुण मिळाले. आणखी एक मार्क मिळाला असता तर ती महापालिकेकडून मिळणाऱ्या एक लाखाच्या बक्षिसाला पात्र ठरली असते. दहावीत ९० टक्‍क्‍यांवर गुण मिळविणाऱ्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.   

मनीषाची आई प्रमिला शिवणकाम करते, तर वडील एका खासगी कंपनीत नोकरी. दोघांचीही कमाई जेमतेमच. त्यामुळे भाड्याच्या घरात राहूनच ते प्रपंचाचा गाडा हाकताहेत. खासगी शाळेत मुलीला शिकवायचे, तर फी कुठून भरायची, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न. त्यामुळे त्यांनी मनीषाला महापालिकेच्या शाळेत घातले. ती अभ्यासात कायमच पुढे राहिली. पहिलीपासून तिने कधी नंबर सोडला नाही. दहावीतही तिला ९५ टक्‍क्‍यांच्या वर गुण मिळतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. पहिल्या क्रमांकाबरोबरच ती लाखाची मानकरी ठरेल, तिच्या आईवडिलांना तेवढाच हातभार लागेल, असे सर्वांना वाटत होते; पण सर्वांच्या आशेवर पाणी फिरले ते केवळ एका मार्काने. दरम्यान, मुख्याध्यापक व वडिलांनी तिचे पेपर पुनर्तपासणीसाठी देण्याचे ठरविले आहे. 

बक्षीस म्हणजे विद्यार्थ्यांच्या कष्टाची पावती असते. मनीषा पहिल्यापासून अभ्यासात हुशार आहे. मलाही वाटते की, एका मार्काने तिचे लाख रुपयांचे बक्षीस हुकले. ही गोष्ट मनाला चटका लावून गेली आहे. आम्हाला आशा आहे, की तिचे गुण वाढतील. 
- चंद्रशेखर कदम, मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, थेरगाव  

बेटी ठरली धनाची पेटी
वडील ड्रायव्हर, तर आई घरेलू कामगार. मुलीनं चमकदार कामगिरी मिळवून एक लाख रुपयाचं बक्षीस मिळवलं. एवढी कमाई हातावर पोट असलेल्या दोघा पती-पत्नीची देखील नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी बेटी धनाची पेटी ठरली आहे.

थेरगाव महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील वैष्णवी मरके या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावीत ९०.६० टक्के गुण मिळविले. आईवडील कामाला गेल्यानंतर वैष्णवी घरातील कामे आवरून शाळेला जात.

त्यानंतर स्वत:चा अभ्यास करून लहान भावालाही शिकवत असे. घरात सासू-सासरे मिळून सात जणांचा परिवार आहे. आई मीरा मरके या लहान मुलांचा सांभाळ करून घरोघरी मिळेल ते काम करतात. मात्र, कोरोनामुळे सध्या ही कामे थंडावली आहेत. वैष्णवीला मिळालेल्या गुणामुळे ती महापालिकेच्या लाखाच्या बक्षिसाला पात्र ठरली आहे. ,वडील संतोष मरके म्हणाले, ‘‘मोठी मुलगी इंजिनिअर आहे. लहान मुलगा सातवीला आहे. सर्वांचं भवितव्य उज्ज्वल असावं, अशी आमची इच्छा आहे. गरिबीच माणसाला तारते. मुलं हुशार आहेत. त्यामुळे आमच्या कष्टाला आणखी बळ मिळतं.’’   

Edited By - Prashant Patil

loading image