PImpri : 'पवना खोऱ्यात पीएमपीएल सुरू करा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP Bus

'पवना खोऱ्यात पीएमपीएल सुरू करा'

वडगाव मावळ : स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांच्या सोयीसाठी मावळ तालुक्यातील पवना खोऱ्यात पीएमपीएलची बससेवा सुरू करावी, असे साकडे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना घातले आहे.

दळवी यांच्यासह पवना धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष दशरथ शिर्के, दूध सोसायटीचे अध्यक्ष भरत आडकर, तुषार दळवी आदींनी पुण्यात महापौर मोहोळ यांची भेट घेऊन पवना खोऱ्यातील बससेवेबाबत चर्चा करून मागणीचे निवेदन दिले. सध्या एसटीच्या संपामुळे पवन मावळातील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, मजूर आदी सर्व घटकांच्या दळणवळणाची मोठी गैरसोय झाली आहे. पवना खोऱ्यातील ६५ गावे त्यात पवनानगर सोमाटणे मार्गावरील २५ ते ३० गावे, पौड ते पवनानगर मार्गावरील २५ ते ३० गावे व कामशेत पवनानगर मार्गावरील गावातील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय झाली आहे.

एरवीही तळेगाव आगारातून चालणाऱ्या एसटी सेवेतही ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. जुन्या झालेल्या गाड्यांमुळे नादुरुस्तीचे प्रमाण, चालक व वाहकांची कमतरता, त्यामुळे सेवेत होणारी अनियमितता आदी बाबींमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या भागात पीएमपीएलची बससेवा सुरू झाल्यास त्यांची गैरसोय दूर होऊन त्यांचा प्रवास सुलभ होईल. मनपा ते पौड मार्गे पवनानगर, मनपा ते सोमाटणेमार्गे पवनानगर व मनपा ते कामशेतमार्गे पवनानगर अशी बससेवा सुरू केल्यास पवन मावळातील अनेक गावांना त्याचा लाभ होईल. पुण्यातून अनेक पर्यटक पवना धरण व परिसरात पर्यटनासाठी येत असतात. या भागातून बससेवा सुरू झाल्यास त्यांचीही गैरसोय दूर होईल व पर्यटनास आणखी वाव मिळेल.

loading image
go to top