कोरोना योद्‌ध्यांची अवहेलना थांबवा; पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण्यांकडून चिखलफेक

कोरोना योद्‌ध्यांची अवहेलना थांबवा; पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण्यांकडून चिखलफेक

जीवनाची स्वप्ने घेऊन काही जण काही महिन्यांपूर्वी शहरात आले. निमित्त होते कोविड केअर सेंटर अर्थात मल्टिस्पेशालिटी जम्बो फॅसिलिटी रुग्णालयाचे. 'आता रोजगाराचा प्रश्‍न सुटणार' या विचाराने सर्वजण प्रभावित झालेले. शिक्षणानंतर सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभीच हायरिस्कची नोकरी मिळाली. कोरोना महामारीत रुग्णसेवेची जबाबदारी होती. धोका माहिती होता. पण, संधीचे सोने करण्याचे आव्हान होते. ते स्वीकारले. काही दिवस कामही केले. कोरोना योद्धा म्हणून कौतुकही झाले. आता पगार मिळतोय म्हणून आनंदात होते. काही तर पहिल्या पगाराचा अविस्मरणीय क्षण साजरा करणार होते. पण, त्यावर पाणी फिरले. पगार मिळालाच नाही, उलट संघर्ष करावा लागला. काहींना कामावरून कमी केले. 'कोरोना रुग्ण संख्या कमी झाली म्हणे'. ठेकेदाराने ठेंगा दाखवला. सरकार बहिरे झाले. प्रशासन ठेकेदाराकडे बोट दाखवू लागले. लोकनियुक्त कारभाऱ्यांनी राजकारण सुरू केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेतील सत्ताधारी राज्य सरकारला तर, राज्य सरकारचे समर्थक महापालिका सत्ताधाऱ्यांना दोषी ठरवू लागले. एकमेकांवर चिखलफेक करू लागले. पण, ज्यांनी आयुष्यातील क्षण तुमच्या शहरासाठी, तुमच्या रुग्णांसाठी खर्च केले, त्यांचं काय? रुग्णसंख्या कमी झाली हा त्यांचा दोष आहे का? रुग्णसंख्या घटली नसती तर तुम्ही असेच वागले असते का? रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर, त्यांची गरज भासणार नाही का? कोरोना योद्‌ध्यांना परत बोलावल्यास ते येतील का? इतके शिक्षण घेऊनही पदरी निराशाच पडत असेल तर शिक्षण घेऊन उपयोग काय? पुढील पिढीला ते काय सांगतील? याचा कोणी विचार केलाय. कोणीच नाही. कोणत्याही कामाचा वाढीव मोबदला, कामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमत वाढीतील फरक, एखाद्या कामाच्या खर्चाला कार्योत्तर मान्यता दिली जाते. सर्व काही करारानुसार पूर्तता करावी लागते. मग, कोरोना योद्‌ध्यांच्या कार्याची पूर्तता करण्यासाठी कुचराई का? की त्यांचा कोणी वाली नाही म्हणून, हे सर्व नाटक सुरू आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जरा विचार करा, रिस्क घेऊन ही मंडळी आली नसती, तर तुमच्या शहरातील कोरोना रुग्णांचे हाल काय झाले असते. आणखी किती बळी गेले असते. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची राज्यातील सर्वच शहरांची टक्केवारी पाच टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होती. कोरोना योद्‌ध्यांमुळे शहरात हे प्रमाण अवघा 1.7 टक्‍क्‍यांपर्यंत राहिले. यात कोरोना योद्‌ध्यांचे योगदान खूप मोठे आहे. खासगी रुग्णालयांनी दुपटीपेक्षा अधिक मेहनताना देऊन डॉक्‍टर, नर्स यांची नेमणूक केली. त्या मोहाला बळी न पडता ही मंडळी शासकीय व निमशासकीय यंत्रणेच्या अखत्यारितील रुग्णालयात दाखल झाले. त्याचे फळ काय तर, हकालपट्टी. कमी दामात अधिक मेहनत, हाच काय कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान. छे! हा तर अवमान. त्यांचा सन्मान करून अवहेलना थांबवायला हवी. अन्यथा यंत्रणेवरचा विश्‍वासच उडेल. पुन्हा अशी महामारी निर्माण झाली किंवा पुन्हा फिरून आली तर, असे योद्धे मिळणे दुरापास्त होईल. हे टाळण्यासाठी अशा योद्‌ध्यांचा सन्मान व्हायलाच हवा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com