`त्याच तिकिटावर तोच खेळ करणे थांबवा`; आमदार सुनिल शेळकेंचा भाजपला टोला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

पवना जलवाहिनीबाबत आमदार शेळके यांची भाजपवर टीका  

वडगाव मावळ : मावळातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी बाबत त्याच तिकिटावर तोच खेळ करणे आता थांबवावे अशी टीका आमदार सुनिल शेळके यांनी केली आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेळके यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील नऊ वर्षापासून स्थगित असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हालचाली सुरु झाल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. सन २०११ मध्ये  जलवाहिनीच्या प्रकल्पास विरोध करताना तीन शेतकरी शहीद झाले होते तर काही जखमी झाले होते. याचे भावनिक राजकारण करून व आमचा पवना बंद जलवाहिनी प्रकल्पास विरोध आहे असे मावळमधील जनतेला भासवून, दुसरीकडे पवना बंद जलवाहिनीचे काम आम्ही लवकरात लवकर पुर्ण करु असे पिंपरी-चिंचवडकरांना सांगून सन २०११ पासून पवना बंद जलवाहिनीच्या नावाखाली मतांचे राजकारण केले जात आहे. जर भाजपचा या प्रकल्पास विरोध होता तर भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता असताना हा प्रकल्प रद्द का केला नाही ? असा सवाल आमदार शेळके यांनी भाजपाच्या नेत्यांना केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवना बंद जलवाहिनी सोडून त्यांच्याकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही. एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते पवना जलवाहिनी प्रकल्पाला  पाठींबा देत आहेत तर दुसरीकडे मावळ मधील भाजपाचे पुढारी त्यास विरोध करत आहेत. यावरुन भाजपची दुट्टपी भूमिका स्पष्ट होत आहे. भाजपाचा बंद जलवाहिनीस विरोध असेल तर  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांची या संदर्भातील पक्षाची भूमिका स्थानिक पुढाऱ्यांनी लेखी स्वरुपात आणावी. जर त्यांचाही बंद जलवाहिनीस विरोध असेल तर आम्हीही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करु. भाजपची ही दुटप्पी भूमिका मावळच्या जनतेच्या लक्षात आली आहे. या प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करत असताना भाजपने स्थानिक शेतकरी किंवा भूमिपुत्र जो निर्णय घेत असतील त्याला पाठिंबा द्यावा. तुमच्या राजकारणामध्ये स्थानिक भूमिपुत्रांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये याचे भान ठेवावे. स्थानिक शेतकरी व  नागरिक यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन योग्य निर्णय घ्यावा. राजकीय व्यक्तींनी यापासून दूर रहावे असे मतही आमदार शेळके यांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop playing the same game on the same ticket`; MLA Sunil Shelke say to bjp