Positive Story : छिन्नी, हातोडीच्या बळावर दिला संसाराला ‘आकार’ (व्हिडिओ)

रामदास वाडेकर
Thursday, 24 December 2020

पाटा, वरवंटा करणाऱ्या हौसाबाई पवार यांची कहाणी; सरकारी मदतीशिवाय मिळविले यश

कामशेत (ता. मावळ) : चाळीस वर्षे झाली संसाराला. या चाळीस वर्षांत कधी डोक्‍यावरून, तर कधी गाढवाच्या पाठीवरून दगडी वाहिल्या. या दगडाचे वरवंटे, पाटे घडवले अन्‌ गावोगावी जाऊन विकले. तेथेच राहुटी टाकून राहिलो. आज लेकरं मोठी झाली, ती शिकली, घरदार झालं, त्यांची लग्नं झाली. सरकारच्या मदतीशिवाय मी माझ्या संसाराचा गाडा नेटाने ओढला याचा मला अभिमान आहे, असे कान्हेत रस्त्याच्या कडेला वरवंटा-पाटा विकणाऱ्या हौसाबाई श्रावण पवार सांगत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंचवीस वर्षांपासून त्या रस्त्याच्या कडेला झोपडी करून राहत. नशिबी व्यसनी पतीची साथ असली की, कष्टाला पारावार मग कधी डोक्‍यावर दगडी वाहणे आलेच. तर कधी गाढवाचं पाठीवर दगडी घेऊन गावोगावी भटकणे परंपरेने आले. दगडावर छन्नी हातोडीचे घाव घालून त्याला आकार देणाऱ्या हौसाबाईच्या संसाराला याच व्यवसायाने आकार दिला. चाळीस वर्षापूर्वी श्रावण पवार त्या विवाहबद्ध झाल्या. चाकण गाव सोडून पंचवीस वर्षांपूर्वी कान्हे गाठले. तिथेच तंबू ठोकून त्याच्या संसाराचा गाडा सुरू झाला. राहुल, सुनीता, सारिका, किरण ही लेकर लहानाची मोठी झाली. येथेच शिकली. किरण वगळता सगळ्यांची लग्न झाली. लॉकडाउनच्या पाहिल्या दिवशी पती वारले. व्यसनी पतीच्या आधारावर त्यांनी संसार केला. मावळातील गावोगावी त्या गेल्या. तिथेच राहुटी करून त्यांनी पाटा, वरवंटा, जात, खलबत्ता, दगडी दिवा, उखळ, तुळशी वृंदावन, महादेवाचे पिंड दगडातून घडविल्या आणि विकल्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरासरी दोनशे ते दीड हजार रुपये किमतीने आज त्या वस्तूची विक्री करीत आहेत. किरण हा मुलगा आईला मदत करतो. किरण म्हणाला, ‘‘नगर जिल्ह्यातील वाबुंरी गावातून आणि कर्नाटकातून वर्षाला एक लाख रुपये किमतीचा ते दगड खरेदी करतो. येथे आणून तो घडवतो आणि विकतो.’’ 
भूषण गरुड म्हणाले, ‘‘मिक्‍सरच्या चटणीपेक्षा पाटावर वाटलेली चटणीची चव खूप चांगले आहे.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्हाला सरकारने कोणतीच मदत केली नाही. घरकुल योजनेतील घर मिळाले नाही, की लॉकडाउनमध्ये मदतीचा हात कोणी दिला नाही. मात्र, स्वतःच्या कष्टातून मी आनंद मिळविते.
- हौसाबाई पवार, व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of hausabai pawar who made varvanta at kamshet maval