Video : जिद्द असावी ती अशी, ऑनलाइन शिक्षण घेता आलं नाही म्हणून 'तो' थांबला नाही

पीतांबर लोहार
Friday, 17 July 2020

- शेळ्या राखून सहावीतील रोहित करतोय स्वयंअध्ययन 

पिंपरी : आळंदी- वडमुखवाडी- भोसरी एमआयडीसी रस्ता. त्याच्या कडेला एक अकरा-बारा वर्षांचा मुलगा एका मोठ्या दगडावर बसला होता. त्याच्या आजूबाजूला एक शेळी व तिचे दोन-तीन करडू चरत होती. मुलाच्या हातात पुस्तक होते. ते तो वाचत होता. चौकशी केल्यावर कळले, की तो सहावीत आहे. शेळ्या त्याच्या आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवून अभ्यासही करतो आहे. रोहित शिंदे असे त्याचे नाव. एकीकडे लॉकडाउन, कोरोनामुळे शाळा बंद आहेत. काही शाळांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पण, ज्यांच्याकडे ऑनलाइनची सुविधा नाही. स्मार्टफोन नाही, त्यांनी शिक्षण घ्यायचं कसं. यावर हा चिमुकला रोहित उपाय ठरला. तो स्वयंअध्ययन करीत होता. ऑफलाइन शिक्षण. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वडमुखवाडी परिसरातील माळरानावर दोन-चार छोट्या कंपन्या आहेत. काही भंगाराची गोदामे आहेत. त्याकडे लक्ष ठेवून फावल्या वेळात रोहितचे वडील गणेश शिंदे रिक्षा चालवतात. आई गृहिणी आहे. गेल्या वर्षी हे कुटुंब मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून कामाच्या शोधात शहरात आले. वडिलांना काम मिळाले. मुलाला अर्थात रोहितला भोसरी धावडेवस्तीतील भैरवनाथ विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल केले. छोट्या मुलाला महापालिकेच्या वडमुखवाडीतील शाळेत पहिलीत दाखल केले. या एक-सव्वाएक वर्षात दोन पैसे मागे टाकून त्यांनी एक शेळी विकत घेतली. तिला आता करडू झाली आहेत. त्यांच्यावरच रोहित लक्ष ठेवून अभ्यास करीत होता. रस्त्याच्या कडेला माळरानावरील एका मोठ्या दगडावर बसून... 

कोरोना व लॉकडाउनमुळे जुलै महिना अर्धा संपला, तरी शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. काही शाळांनी ऑनलाइन शिकवण्यावर भर दिला आहे. पण, रोहितच्या शाळेने अद्याप काहीही कळविलेले नाही. शिवाय त्याचे वडील गणेश यांच्याकडे स्मार्टफोन नाही. परंतु, मुलाची अभ्यासाची आवड लक्षात घेऊन त्याला जुनी पुस्तके आणून दिली. ती वाचून तो स्वतःच अभ्यास करीत असतो. 'सकाळ' प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला, त्या वेळी रोहित मराठीच्या पुस्तकातील 'माहेर'ही कविता वाचत होता. 

पिंपरी-चिंचवड : गणेशमूर्ती स्टॉलधारकांना यंदा परवानगी मिळणार, मात्र...

पिंपरी-चिंचवडमधील राखी उत्पादकांना सतावतेय ही चिंता, तर विक्रेते म्हणतायेत...

मराठीसह भुगोल, परिसर अभ्यास, गणित हे विषय आवडीचे असल्याचे रोहितने सांगितले. ग्रह, तारे खूप आवडतात. त्यांच्याविषयी वाचायला खूप आवडते, असे त्याने आवर्जून नमूद केले. या संबंधिची काही प्रश्‍न त्याला विचारली. त्याची अचूक व विनाअडखडत उत्तरे त्याने दिली. त्याच्याशी संवाद साधत असताना शेळी व तिचे करडू रस्त्याच्या पलीकडे गेली होती. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तोही रस्त्याच्या पलीकडे गेला आणि शेळी व तिच्या करडूंवर लक्ष ठेवू लागला. पण, त्याची एक नजर शेळीवर आणि दुसरी नजर पुस्तकातील पाठात. शाळा कधी सुरू होणार हे माहीत नाही. पण, अभ्यास सुरू ठेवायचा, स्वंयअध्ययन करीत राहायची, यातून त्याची शाळेविषयीची, अभ्यासाविषयीची गोडी दिसून आली. 

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student rohit shinde is doing self-study keeping goats