esakal | तुम्ही जग सोडलं; कुटुंबाचं काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

तुम्ही जग सोडलं; कुटुंबाचं काय?

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी - आत्महत्या (Suicide) करून स्वतःचे जीवन संपवले. हे जग सोडलं. मात्र, एक व्यक्ती गेल्यानंतर कोणाच्या आई-वडिलांचा वृद्धापकाळातील आधार (Support) जातो, पत्नीचा जीवनसाथी जातो, एखाद्या बहिणीचा भाऊ जातो, तर कुणाच्या तरी डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपते. संपूर्ण कुटुंब कोसळते. काही कारणांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्यासारखा विचार करण्याअगोदर आपल्या कुटुंबाचा विचार करणे आवश्यक आहे. (Suicide Person Family Care)

शहरात मागील काही दिवसांत आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. यात तरुणांसह वृद्धांचा, नवविवाहितांचा व विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समावेश आहे. पुणे पोलिस दलातील २८ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले. त्यामुळे चारवर्षीय चिमुकलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. ताथवडे येथे काही जणांच्या त्रासाला कंटाळून कला दिग्दर्शकाने आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. दहा दिवसांपूर्वी चिखलीतील घरकुल येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना काही तासांच्या अंतरात घडल्या. यामध्ये तरुणासह वृद्धाचा समावेश आहे. तरुण मुलगा अचानक गेल्याने कुटुंबाचा मोठा आधार गेला.

हेही वाचा: नागरिकांच्या 'आरटीओ'तील खेपा वाचणार!

आत्महत्या करून आपण जग सोडून जात असलो तरी मागे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. कुटुंबाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे कोणतेही संकट आले तरी त्यातून मार्ग निघू शकतो. आलेल्या संकटातून, तणावातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या हा उपाय नाही. परिस्थिती बदलणार आहे, असे सकारात्मक विचार डोक्यात ठेवून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.

...अन्‌ मनात विचार घोंघावू लागतात

पात्रता असूनही योग्य वेळी योग्य संधी न मिळणे, आर्थिक नुकसान, प्रेमभंग, मुलांकडून, पती-पत्नीकडून अवहेलना, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे अकस्मात निधन होणे, अपेक्षाभंग, कोणासाठी किती केले तरी त्या व्यक्तीकडून आदर, प्रेम न मिळणे अशा अनेक कारणांमुळे डिप्रेशन येते आणि टोकाचा निर्णय घेण्याचे विचार मनात घोंघावू लागतात.

आजच्या जीवनशैलीमुळे सर्व क्षेत्रांत तणाव ही मोठी समस्या झाली आहे. उदासीन न होता आहे त्यातून मार्ग काढून स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या कुटुंबाचा आधार बना. नकारात्मक विचाराने खचायला होते. आत्महत्येचा टोकाचा विचार केल्याने स्वतःला काही मिळत नाहीच, परंतु कुटुंबीयांना मात्र ती दुःखद आठवण खचून टाकते. यशाची, सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असली तरी त्याचा निष्कर्ष मानसिक समाधानातच आहे. नात्यांमध्ये सुसंवाद ठेवा, जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करा, स्वतःला वेळ द्या. खूप आनंद मिळेल जेव्हा आपण स्वतःला ओळखू.

- वंदना मांढरे, समुपदेशक

हेही वाचा: महामेट्रोच्या कार्यपद्धतीवर पुण्यात रिक्षा पंचायतीचे आक्षेप

हे करा...

 • व्यायाम, योग, सकस जेवण

 • नात्यांमध्ये सुसंवाद असावा

 • एकमेकांच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा

 • किमान तीन-चार मित्र/मैत्रिणी असे असावेत, की ज्यांच्याजवळ मनातील भावना व्यक्त करता येतील

 • आवडत्या व्यक्तीची भेट घ्यावी

 • स्वतःला वेळ द्या, स्वतःशी बोला

 • दिवसातून थोडा वेळ स्वतःसोबत घालवा

 • आपण नक्की काय करतो, कसे वागतो, का वागतो, आपली ध्येय, स्वप्ने, आपली संगत यांचा विचार करा

हे होऊ देऊ नका...

 • उदासीनता, एकटेपणा

 • सर्वांमध्ये असूनही आपण त्यांच्यामध्ये नाही

 • एकाग्रता कमी होणे, सतत विचारांची घालमेल

 • सकारात्मक गोष्टीकडे लक्ष जात नाही,

 • सर्व आपल्यालाच कसे भोगावे लागते आहे असे विचार

 • आपल्याला कोणी समजून घेत नाही, अशी भावना तयार होणे

 • आत्मसन्मान, निर्णय क्षमता, स्वतःवरील विश्वास कमी व्हायला लागतो

 • छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे

 • स्वतःमधील आत्मविश्वास कमी होणे

loading image