esakal | नागरिकांच्या 'आरटीओ'तील खेपा वाचणार!
sakal

बोलून बातमी शोधा

rto

नागरिकांच्या 'आरटीओ'तील खेपा वाचणार!

sakal_logo
By
- मंगेश कोळपकर

पुणे : वाहन चालविण्याच्या लायसन्सची दुय्यम प्रत (डुप्लीकेट) आणि लायसन्स नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्याची प्रक्रिया परिवहन आयुक्त कार्यालयाने सुरू केली आहे. येत्या दोन महिन्यांत ही सेवा कार्यान्वित होईल. त्यामुळे त्यासाठी आरटीओच्या पायऱ्या झिजविण्याची नागरिकांना गरज भासणार नाही. घरबसल्याही त्यांचे लायसन्सचे ते नुतनीकरण करू शकतील.

पक्के लायसन्स हरविल्यास किंवा पत्ता बदललेल्या पत्त्याची नोंद करण्यासाठी नागरिकांना दुय्यम प्रत आवश्यक ठरते. मात्र, लायसन्स हरविल्यास त्याची दुय्यम प्रत मिळविण्यासाठी नागरिकांना पोलिसांकडे तक्रार करावी लागते. त्या तक्रारीची प्रत, जुन्या लायसन्सची झेरॉक्स आणि वैयक्तिक तपशीलाची कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे सध्या ऑनलाईन पद्धतीने परिवहनच्या संकेतस्थळावर अपलोड केली तरी, त्यांची प्रिंटआऊट स्थानिक ‘आरटीओ’ कार्यालयात जाऊन जमा करावी लागते. त्यानंतर नागरिकांना डुप्लिकेट लायसन्स घरपोच मिळते. तसेच लायसन्सच्या नूतनीकरणाबाबतही आहे. ऑनलाईन कागदपत्रे दिली तरी, प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जावेच लागते. त्यात हस्तक्षेप करण्यासाठी एजंटांना वाव होता. यामुळे आरटीओ कार्यालयांवर ताण येत होता. त्याची दखल घेऊन परिवहन आयुक्त कार्यालयाने ही दोन्ही कामे आता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडून (एनआयसी) त्या बाबत सध्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यावर या योजनेची अंमलबजावणी होईल.

हेही वाचा: उरवडे आग प्रकरण : कंपनी मालकासह DISHचे अधिकारीही तेवढेच जबाबदार

डुप्लिकेट लायसन्स किंवा लायसन्सचे नुतनीकरण ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित वाहनचालकाच्या आधार कार्डला त्याचा मोबाईल क्रमांक लिंक करावा लागेल. अन्यथा त्यांना ही सुविधा ऑनलाईन पद्धतीने मिळणार नाही. ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड केल्यावर वाहनचालकाच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ येईल. तो वेबसाईटवर समाविष्ट केल्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

''लायसन्सची दुय्यम प्रत ऑनलाईन आणि लायसन्सचे नुतनीकरण घरबसल्या नागरिकांना करणे अल्पावधीत शक्य होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया परिवहन आयुक्त कार्यालयाने सुरू केली आहे. एनआयसी सध्या त्या बाबत चाचण्या घेत आहेत. लवकरात लवकर ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. ''

- संदेश चव्हाण (उपपरिवहन आयुक्त)

हेही वाचा: तहसीलदार झाली पण नियुक्ती नाही; कोरोनाने आई-वडिलांनाही हिरावलं

''या दोन्ही सुविधा नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. तसेच स्थानिक आरटीओ कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना त्या बाबत पुरेशी माहिती आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या बरोबरच सर्वत्र बंद पडणे, वेबसाईट हॅंग होणे आदी समस्याही तातडीने दूर करणे गरजेचे आहे.''

- राजू घाटोळे (अध्यक्ष - राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन)

लायसन्स नुतनीतरणाचा असा आहे नियम

  • एखादा २४ किंवा ३२ वर्षांचा वर्षांचा युवक पर्मनंट लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आता वयाच्या ४० वर्षांपर्यंत लायसन्स मिळते.

  • वयाच्या ४० व्या वर्षानंतर दर पाच वर्षांनी लायसन्सचे नुतनीकरण करावे लागते. आता ते ऑनलाईन पद्धतीने झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

  • संगणकीकृत लायसन्सचे वाटप - सुमारे २ कोटी ११ लाख

  • दरवर्षी लायसन्स नुतनीकरण करण्यासाठीची एकूण प्रकरणे - सुमारे ५ लाख

loading image