शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग'

आशा साळवी
Friday, 4 September 2020

  • कोरोनाच्या साथीमुळे कोणतीही निर्णय नाही
  • शिक्षण विभागाकडून नियोजन नाही 

पिंपरी : दरवर्षी महापालिकेकडून खासगी व महापालिका शिक्षकांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देऊन गौरविले जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीचे पुरस्कार अद्याप जाहीर झालेले नाहीत. कोरोनामुळे शिक्षकदिन पुरस्काराविना सुनासुना जाणार असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या 24 निकषांनुसार पिंपरी महापालिकेकडून शिक्षकदिनी पुरस्कार देऊन गौरविले जाते. यासाठी महापालिका आणि खासगी शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील पंचवीस वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांकडून कार्य अहवाल मागविण्यात येतो. महिनाभरापासून या समारंभाची तयारी सुरू असते. त्यासाठी पुरस्कार निवड समिती स्थापन केली जाते. त्यांच्याकडून कार्यअहवाल तपासून शिफारस केली जात असते. दरवर्षी अगदी पन्नास शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी मात्र 'शिक्षक दिन' एका दिवसावर आलेला असतानाही शिक्षण विभाग प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली दिसून येत नाही. पुरस्कार निवड समितीची बैठक देखील झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचा 'आदर्श शिक्षक' व 'आदर्श शाळा' पुरस्कार समारंभ यावर्षी शिक्षकदिनी होणार नसल्याचे एकूण चित्र दिसत आहे. 

वर्षानुवर्षांची परंपरा खंडित 
दरवर्षी शिक्षण विभागाकडून शिक्षकदिनी शिक्षकांचा पुरस्कार देऊन दखल घेण्यात येते. ही परंपरा गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू आहे. राज्य सरकारच्या पुरस्काराप्रमाणेच महापालिकेकडून मिळणाऱ्या पुरस्काराचेही शिक्षकांना अप्रूप असते. या दिनी योग्य नियोजन करून अगदी जेवणावळीचा कार्यक्रम रंगलेला असतो. प्रत्येकजण सहकुटुंब आनंदात सहभागी झाल्याची वातावरण असते. "या वर्षी तरी पुरस्कार मिळेल' या आशेने दरवर्षी शिक्षक काम करीत असतो. पण यंदा कोरोनामुळे अनेक शिक्षकांचा अपेक्षाभंग झाल्याची भावना मुख्याध्यापक नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केली. 

यावर्षी नगरसेवक निर्धास्त 
दरवर्षी बहुतांशी नगरसेवक आपापल्या वॉर्डातील शिक्षकांना "आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाकडे "फिल्डिंग' लावून असतात. कोणाची ना कोणाची शिफारस घेऊन प्रशासन अधिकारी, पर्यवेक्षकांवर दबाव टाकण्यात येतो. परिणामी ही यादी वाढत जाते, हे दरवर्षीचे चित्र यंदा पाहण्यास मिळणार नाही. कोरोनामुळे समारंभच रद्द केल्याने या वर्षी एकाही नगरसेवकाची शिफारस पत्रच आले नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमास राज्य सरकारकडून बंदी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याविषयी काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिक्षकांकडून कार्यअहवाल मागितलेला नाही. 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher's day without awards this year in pimpri chinchwad