Pimrpi chinchwad : परीक्षा शुल्क परताव्याचा अतिरिक्त ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimrpi chinchwad : परीक्षा शुल्क परताव्याचा अतिरिक्त ताण

Pimrpi chinchwad : परीक्षा शुल्क परताव्याचा अतिरिक्त ताण

पिंपरी : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. परंतु शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचा तपशील सादर करण्याची सूचना केल्यामुळे शिक्षक अतिरिक्त कामामुळे वैतागले आहेत. विद्यार्थ्यांचा तपशील आणायचा कुठून? असा प्रश्‍न शिक्षक व मुख्याध्यापकांना पडला आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे २०२१ची दहावी आणि बारावीची परीक्षा गेल्यावर्षी रद्द केली होती. मात्र त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते. परीक्षा न झाल्याने शुल्क परत करण्याची मागणी होती. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना ५९ रुपये आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ९४ रुपये परत मिळणार आहेत. त्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी २५ नोव्हेंबरपर्यंत तपशील सादर करायचा आहे. मात्र, आता बारावीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा बॅंक खात्याचा तपशिल आणणार कोठून? असा प्रश्‍न शिक्षकांसमोर आहे. बोर्डाकडून शाळा-महाविद्यालयांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यावर परतावा जमा होणार आहे. लॉगइन व पासवर्डचा वापर करून उपलब्ध होणाऱ्या फॉर्ममध्ये शाळेने अचूक माहिती भरण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना पात्र व अपात्र करताना दुबार लाभाबाबत महाविद्यालयाकडील अभिलेखांवरून खात्री करूनच माहिती भरायची असल्याने शिक्षकांनी शिकवायचे हे काम करायचे का? असा प्रश्‍न शिक्षक दबक्या आवाजात करत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांची पात्र व अपात्र बाबतची माहिती भरल्याशिवाय कार्यवाहीसाठी जाणार नाही. तसेच पात्र व अपात्र विद्यार्थ्यांबाबत माहिती शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे सूचना फलकावर विद्यार्थ्यांचे माहितीसाठी लावण्याच्या सूचनादेखील बोर्डाने केल्या आहेत. परत केलेल्या परीक्षा शुल्क रकमेची माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अपलोड करायची आहे. पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची रक्कम मंडळाने अदा केलेल्या रकमेतून परत करण्याची जबाबदारी शाळेची राहणार असल्याने मुख्याध्यापक व प्राचार्य हैराण झाले आहेत.

हे विद्यार्थी ठरणार पात्र

माध्यमिक शाळेतील / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या ज्या विद्यार्थ्यांना शासन योजना व इतर अन्य योजनांमधून परीक्षा शुल्काचा लाभ मिळत आहे. त्या विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्काचा दुबार लाभ मिळणार नाही. तसेच जे विद्यार्थी सन २०२१ च्या मुख्य परीक्षेला श्रेणी सुधार योजने अंतर्गत प्रविष्ट झालेले होते व शासन निर्णयानुसार त्यांचा निकाल तयार न केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ च्या पुरवणी परीक्षेस श्रेणीनुसार योजनेंतर्गत प्रविष्ट झाले आहे. अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आकारण्यात आले नसल्याने या योजनेसाठी पात्र करू नये, याची दक्षता घेऊनच विद्यार्थ्यांची माहिती देण्यात यावी.

loading image
go to top