esakal | देहू; तुकोबांच्या अंगणी गेले रिंगण रंगूनी!
sakal

बोलून बातमी शोधा

देहू; तुकोबांच्या अंगणी गेले रिंगण रंगूनी!

देहू; तुकोबांच्या अंगणी गेले रिंगण रंगूनी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देहू : आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात रविवारी (ता. ११) झाले. पायी वारीत तिथीनुसार हे गोल रिंगण बेलवंडी येथे दरवर्षी होत असते.

कोरोनामुळे यंदा पायी वारी रद्द केली आहे. मात्र, संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे पायी वारी नित्यातील कार्यक्रम, पूजा, कीर्तन दररोज देहूतील देऊळवाड्यात साजरे केले जात आहे. सरकारने दिलेल्या मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम परंपरेनुसार संस्थान करीत आहे.

हेही वाचा: पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक

पायी वारीमध्ये रविवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सणसर येथील मुक्काम संपवून पहाटे सहा वाजता बेलवंडी येथे येतो. बेलवंडी येथे पहिले गोल रिंगण होते. मानाचे अश्‍वही या गोल रिंगणात सहभागी होतात. रिंगणानंतर पालखी सोहळा जेवणासाठी गावात थांबतो. तासभर विसाव्यानंतर पालखी सोहळा अंथुर्णे येथे मुक्कामी जातो. म्हसलेकरांचे कीर्तन होते, तर कानसुरकर दिंडीतर्फे जागर होतो.

दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये भजनी मंडपातून सकाळी दहा वाजता देऊळवाड्यात आणण्यात आल्या. पालखीपुढे देहूकरांची दिंडी होती. ज्ञानोबा-तुकाराम नामघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने वातावरण भक्तीमय झाले. सुरुवातीला दिंडीतील विणेकऱ्यांनी पालखीभोवती प्रदक्षिणा मारली. त्यानंतर तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. ज्ञानोबा-तुकोबांचे भजन झाले. वारकऱ्यांनी पावले खेळली. त्यानंतर संपूर्ण दिंडीतील वारकऱ्यांनी प्रदक्षिणा मारली. मानाच्या अश्‍वाचे गोल रिंगण झाले. त्यानंतर उडी घेऊन रिंगण सोहळ्याची सांगता झाली. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विश्‍वस्त विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.

loading image