Pimpri : सर्वसाधारण सभा आता गुरुवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

सर्वसाधारण सभा आता गुरुवारी

पिंपरी : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, व्हायोलीनवादक प्रभाकर जोग यांच्यासह निधन झालेले शहरातील अन्य मान्यवर आणि दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून सोमवारची महापालिका सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. ही सभा गुरुवारी (ता. १८) दुपारी दोन वाजता होणार आहे.

नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, केशव घोळवे, संगीता ताम्हाणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी चर्चेत सहभाग घेतला. पीठासन अधिकारी उपमहापौर हिराबाई घुले, महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ आणि नगरसचिव उल्हास जगताप व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमहापौरांना पहिल्यांदा संधी

वैयक्तिक कारणास्तव महापौर उषा ढोरे गैरहजर राहिल्याने महापालिका सर्वसाधारण सभेच्या पीठासीन अधिकारीपदाचा मान उपमहापौर हिराबाई घुले यांना पहिल्यांदाच मिळाला. २३ मार्च रोजी उपमहापौरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना पीठासन अधिकारीपदावर संधी मिळाली नव्हती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अन्य मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करायचे ठरले होते.

शिवाय, महापालिका निवडणूक फेब्रुवारीत होणार असल्याने आगामी काळात आजची तहकूब व डिसेंबरचीच सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घुले यांना पीठासन अधिकारीपदाची संधी सत्ताधारी भाजपने दिल्याची चर्चा सभेनंतर महापालिकेत रंगली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याची संधी मला मिळाली. अर्धा तास चाललेल्या सभेचे कामकाज सभाशास्त्राच्या नियमानुसार चालविले. पीठासीन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल महापौर, पक्षनेतृत्वाचे आभार मानते.’’

बाबासाहेबांना श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी पिंपरी-चिंचवड शहरातर्फे महापौर उषा ढोरे यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या, ‘‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रासह महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रचार प्रसार केला. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ इतिहास संशोधक, सांस्कृतिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले आहे. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्यातून महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुरंदरे यांनी जगभर पोचविले. शहरातील विविध व्याख्यानमाला आणि कार्यक्रमांमधून त्यांनी ऐतिहासिक विषय मांडले आहेत. त्यांचे जीवनकार्य आणि त्यांनी केलेले लेखन प्रत्येकाच्या स्मरणात राहील.’’

loading image
go to top