Pimpri : जनतेच्या प्रश्‍नाचा अनेकांना उमाळा ;आंदोलनांत सहभाग वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

जनतेच्या प्रश्‍नाचा अनेकांना उमाळा ;आंदोलनांत सहभाग वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पाणी वेळेवर येते का? इतर काही समस्या आहे का? अशी विचारपूस करत सध्या नगरसेवक व इच्छुक उमेदवार घरोघरी फिरत आहेत. महापालिका निवडणूक जवळ येताच संबंधितांना इतका उमाळा आल्यामुळे पाठ फिरताच लोक टर उडवत आहेत.

महापालिका निवडणुकीची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कोणता भाग आपल्यासाठी अनुकूल आहे आहे याची चाचपणी केली जात आहे. यासह पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यामुळे कधी नव्हे ते इच्छुकही विविध कारणास्तव मतदारांच्या दारी जात असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. दरम्यान, नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष दिले जात आहे. त्या सोडविण्यासाठी सर्वांचा आटापिटा सुरु आहे.

यासाठी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेत निवेदनेही दिली जात आहे. यामुळे सध्या प्रशासकीय कार्यालयात निवेदन येण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही समस्या न सुटल्यास आंदोलनेही केली जात आहेत.

एखाद्या मुद्द्यावर पक्षाने मोर्चा, आंदोलन केल्यास त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या थोडकीच पाहायला मिळते. ठराविक कार्यकर्तेच त्यामध्ये सहभागी होतात. ऐनवेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना अक्षरशः फोन करून बोलून घ्यावे लागते, अशी स्थिती असते. मात्र, सध्या उलट परिस्थती असल्याचे पाहायला मिळते. निवडणुकीसाठी इच्छुक असलेले स्वतःहून अशा कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. यामुळे उपस्थितांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

प्रभागात बॅनरबाजी

प्रस्थापितांसह इच्छुकांकडूनही प्रभागात सध्या जोरदार बॅनरबाजी सुरु आहे. वाढदिवस, सण, उत्सव यानिमित्ताने बॅनरवर आपले फोटो झळकावत आहेत. आपल्या पक्षाच्या नेत्यांचे भले मोठे फोटोही टाकायला विसरत नाहीत. कोणत्या ना कोणत्या माध्यमातूनआपले नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

केलेले काम दाखविण्याचा प्रयत्न

छोटे गटर बांधलेले असो अथवा चार बिस्किट पुडे वाटप केलेले असो, अशा छोटया-मोठ्या कार्यक्रमांचे फोटो काढण्याची इच्छुकांना मोठी हौस असते. अशा जुन्या कार्यक्रमांचेही हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. काहींनी तर या कामांचे फोटो असलेले भलेमोठे फ्लेक्सही उभारले आहेत.

निवेदनांचा मारा

जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतशी समस्या सोडविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. सार्वजनिक समस्या असो की वैयक्तिक, त्यामध्ये इच्छुक उमेदवार लक्ष घालून तातडीने संबंधित अधिकाऱ्याला निवेदन देत असल्याचे दिसून येते. यामुळे महापालिका, पोलिस आयुक्तालय, महावितरण आदी विभागाच्या कार्यालयांत सध्या निवेदने येण्याचे प्रमाण वाढले आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांना निवेदने देत, आंदोलने करीत प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न केला जात आहे.

loading image
go to top