सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून वाकडमध्ये फोडले दुकान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

संरक्षण लोखंडी ग्रील, सेंट्रल लॉक कापून व शटर वाकवून चोरटे दुकानात शिरले.

पिंपरी : संरक्षण लोखंडी ग्रील, सेंट्रल लॉक कापून व शटर वाकवून चोरटे दुकानात शिरले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत त्याची वायर तोडून चोरट्यांनी सराफ दुकानातील दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना वाकड येथे उघडकीस आली. 

आकुर्डीत दुकानाचे शटर उचकटून आठ लाखांची चांदी लंपास 

जयंतीलाल गुलाबदास वैष्णव (रा. अशोका थिएटरजवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे वाकड रोड येथील कॉलनी क्रमांक एकमधील सदगुरू कॉलनीत सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. रविवारी (ता. 20) पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी फिर्यादीच्या दुकानाला असलेली संरक्षण लोखंडी ग्रील व सेंट्रल लॉक कापले. त्यानंतर शटर वाकवून चोरटे दुकानात शिरले. 

दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला काळ्या रंगाचा स्प्रे मारून त्याची वायर तोडली. त्यानंतर काउंटरचे लॉक तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने, सीसीटीव्ही डीसीआर यासह दीड हजारांची रोकड, असा एकूण एक लाख 66 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft from a gold and silver shop in Wakad