पिंपरी-चिंचवडमध्ये महावितरण लागलंय कामाला; तीनशे ट्रान्सफॉर्मर्सना लावणार सेफ्टी कव्हर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

  • महावितरणतर्फे देखभाल, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर 

पिंपरी : शहरातील वर्दळीच्या व वस्त्यांच्या ठिकाणी असलेल्या तीनशे रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे. त्यात विजखांबावर असलेल्या दोनशे आणि सिमेंटच्या चौथऱ्यावरील शंभर रोहित्रांचा समावेश आहे. तसेच, एक हजार 901 रोहित्रांच्या परिसरातील स्वच्छता, देखभाल व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. 

कोरोना रुग्ण संख्येबाबत पिंपरी-चिंचवडकरांना आज दिलासा

महावितरणने या वर्षापासून तीन वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी 19 एजन्सीचे पॅनेल तयार केले आहे. रस्त्याशेजारी रोहित्राखाली बसलेले छोटे व्यावसायिक किंवा रोहित्राजवळच घर किंवा अन्य अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी महावितरण आणि महापालिका संयुक्तपणे कारवाई करणार आहे. याविषयी महावितरणने आग्रही भूमिका घेत महापालिकेकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. वीज यंत्रणेजवळ असलेल्या अतिक्रमणाची माहिती महावितरणकडून नियमित स्वरूपात दिली जाणार आहे. नागरिकांनीसुद्धा रोहित्र किंवा इतर वीज यंत्रणेजवळ अनधिकृत बांधकाम करू नये, रोहित्रांच्या कुंपणात सुका किंवा ओला कचरा टाकू नये व या यंत्रणेपासून नेहमी सुरक्षित राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

शहरातील रोहित्रांची स्थिती 

  • पिंपरी विभाग : दोन हजार 884 
  • भोसरी विभाग : तीन हजार 173 
  • बंदिस्त खोलीमध्ये : दोन हजार 299 
  • सार्वजनिक ठिकाणी : तीन हजार 758 
  • लोखंडी कुंपणे : 441 
  • कुंपण नसलेले : 300 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three hundred transformers will get safety cover in pimpri chinchwad