मावळ तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढतोय; आज आणखी पॉझिटिव्ह आढळले

सकाळ वृ्त्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. शुक्रवारी तळेगाव येथील दोन व कामशेत येथील एक, अशा तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या ११८ वर पोचली आहे. दरम्यान, तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असतानाही नागरिकांची बेफिकिरी कायम असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कामशेत येथील एका ६१ वर्षीय व्यक्तीचा, तळेगाव येथील रहिवासी व चाकण येथील एका कंपनीत कामाला असलेल्या ४२ वर्षीय कामगाराचा तसेच, चिंचवड येथील एका कंपनीत व्यवस्थापक असलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. मावळ तालुक्यात बघता-बघता कोरोना रुग्णांची संख्या ११८ वर पोचली आहे. त्यात शहरी ४९ व ग्रामीण भागातील ६९ रुग्णांचा समावेश आहे. पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६९ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्ण नसताना नागरिकांनी खबरदारी बाळगली व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळवले. नंतरच्या काळात तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला व दिवसेंदिवस संख्या वाढतच गेली. अशा वेळी अधिक खबरदारी घेण्याची गरज असताना नागरिकांची बेफिकिरी मात्र, वाढली आहे. तालुक्यातील बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शासकीय व खासगी कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. बिनकामाचे फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजलेले आहेत. इतर नियमांचीही ऐशी-तैशी झाल्याचे दिसून येत आहे.  राजकीय पक्षांनी त्यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज असताना त्यांनीही राजकीय कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासून कार्यकर्त्यांची गर्दी होताना दिसत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कोरोनाचा धोका वाढल्याने नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवावेत. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three peoples were found corona positive in maval taluka