'या' कारणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

पोलिस आयुक्तालयाच्या सर्व पंधरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्रीपासूनच बंदोबस्त तैनात असेल.

पिंपरी : आयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीकोनातून बुधवारी (ता. 5) शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. गस्त वाढविली जाणार असून, प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस आयुक्तालयाच्या सर्व पंधरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्रीपासूनच बंदोबस्त तैनात असेल. नाकाबंदीच्या ठिकाणांसह इतर ठिकाणीही अचानकपणे वाहनांची तपासणी केली जाणार आहे. तसेच, धार्मिक स्थळांसह वर्दळीच्या ठिकाणी 'फिक्‍स पॉईंट' लावण्यात आले आहेत. मंगळवारपासूनच (ता. 4) पोलिसांची गस्त वाढविली असून, यासाठी खासगी पंधरा वाहने घेण्यात आली आहेत. व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारेही हालचाली टिपल्या जाणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बंदोबस्तासाठी पोलिस ठाण्यातील मनुष्यबळासह राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) दोन कंपनी, स्ट्राईकिंग फोर्स, होमगार्डही ठिकठिकाणी तैनात राहणार आहेत. यासह मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी ठिकठिकाणी रुटमार्च करण्यात आला. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना शांतता बाळगण्याबाबतचे आवाहन करण्यात आले. 

आक्षेपार्ह पोस्टवर बारीक लक्ष 

सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांचे बारिक लक्ष राहणार आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास तातडीने कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tight police security in pimpri chinchwad on tomorrow