
सामाजिक बांधिलकीतुनच मानवतेचे दर्शन घडते : उद्योगपती डॉ. सनाउल्ला घरटकर
मुरूड, ता. १ (बातमीदार) : धर्म, जात आणि वंशाच्या पलिकडे जाऊन माणुसकी जपली पाहिजे. समाजामध्ये श्रीमंत-गरीब, उच्च-नीच अशी असलेली दरी कमी झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे आहे त्यातील काही अंश समाजाच्या उत्थानासाठी दिला, तरच वंचितांचा विकास शक्य आहे. सामाजिक बांधिलकीतूनच मानवतेचे खरे दर्शन घडते, असे मत कतार येथील उद्योगपती तथा मुरूडचे सुपुत्र डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी केले.
मुरूड येथील डॉ. तात्याराव लहाने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संजीवनी आरोग्य संस्थेच्या कार्याच्या आढावा बैठकीनंतर डॉ. घरटकर पत्रकारांबरोबर बोलत होते.
ग्रामीण भागात अजूनही शिक्षणाचे प्रमाण कमी दिसून येते. आरोग्याइतकेच महत्त्व शिक्षणाला दिले पाहिजे. मुरूड शहरातील संजीवनी डायलिसिस सेंटर उत्तमरीत्या कामगिरी बजावत असूनग गरजू रुग्णांना अल्पदरात ही सेवा देत रुग्णांचे प्राण वाचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. संजीवनीचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, विभागप्रमुख डॉ. मकबुल कोकाटे, रुग्णवाहिकाप्रमुख राशीद फहीम, मंगेश दांडेकर, अतिक खतीब, कीर्ती शहा, नितीन आंबुर्ले, संचालक जहूर कादरी आदी मान्यवर उपस्थित होते.