बियर शॉपीमध्येच सर्रास देशी, रम, व्हिस्की, व्होडका | Beer Shopee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor
बियर शॉपीमध्येच सर्रास देशी, रम, व्हिस्की, व्होडका

बियर शॉपीमध्येच सर्रास देशी, रम, व्हिस्की, व्होडका

तळेगाव स्टेशन - गतवर्षी लॉकडाउन (Lockdown) दरम्यान बस्तान बसविलेल्या अवैध मद्यविक्रेत्यांना (Illegal Liquor) खुद्द राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाचे काही अधिकारीच अभय देत असल्याने खेड, मावळ तालुक्यात पाहायला मिळते.

तळेगाव दाभाडेसह चाकण परिसरात ठिकठिकाणी बियर शॉपीवर उघडपणे अनधिकृत रम, व्हिस्की विक्री चालू असून, काही परमिटरुमधारकांनी वाइन शॉप म्हणून फलक लावले आहेत. मुंबई-पुणे महामार्ग, तळेगाव-चाकण महामार्गासह तळेगाव आणि चाकण एमआयडीसीत ठिकठिकाणी अनधिकृत, बनावट आणि चढ्या दराने मद्यविक्री चालू आहे. तळेगाव दाभाडे, चाकण परिसरातील मद्यविक्रेत्यांकडून फलकाच्या मानकाबाबतचे नियम पाळले जात नाहीत. मद्य उत्पादक कंपन्यांच्या जाहिरात फलकावर रंगीबेरंगी, रोषणाई केलेल्या फलकांचा आकर्षक झगमगाट मद्यविक्रीच्या दुकानांवर दिसतो. मद्य आणि बियर शॉपीचे फलक मानकानुसार लावण्याची सक्ती असताना रंगीबेरंगी फलक अगदी महामार्गाकडेला लावून दुकानांसह कंपन्यांची जाहिरात केली जात आहे.

बियर शॉपीमध्येच सर्रास देशी, रम, व्हिस्की, व्होडका मिळत असल्याने परमीट रुमधारक आणि लिकरच्या दुकानदारांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. तळेगाव-चाकण महामार्गावरील बहुतांश हॉटेल, धाब्यांवर उघडपणे देशी, विदेशी, बनावट दारू विक्री चालू दिसते. बऱ्याच वेळा पोलिस अथवा जिल्हा पातळीवर पथके येऊन हद्दीत कारवाई करत असले तरी याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र, अनभिज्ञ असल्याचा आव आणताना दिसतात. काही अधिकारीच अवैध मद्यविक्रेत्यांचे पाठिराखे बनल्याने वारंवार निदर्शनास आणूनही अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. बहुतांश विक्रेत्यांकडून लॉकडाउनचे नियम अथवा वेळेची बंधने पाळली जात नाहीत. राज्य उत्पादन शुल्कच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सुसूत्रता आणि परस्पर हेवेदावे असल्याचे दिसते. काही अवैध मद्यविक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील गॉडफादर अथवा गॉडमदर पोसले असून, त्याच जोरावर सर्रास उघडपणे अवैध मद्यविक्री चालू आहे. त्यामुळेच अवैध विक्रेत्यांना उत्पादन शुल्कचे अधिकारीच चिअर्स करीत असल्याचे उघडपणे बोलले जाते.

हेही वाचा: पिंपरी चिंचवड शहरातील पंचवीस टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण

कारवाई करण्याची मागणी

मद्य पिण्याचा परवाने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात मिळण्याऐवजी मद्यविक्रेत्यांना पावती पुस्तक देऊन वसुली केली जाते. विक्रेते कदाचित हाच भार हलका करण्यासाठी बाटलीमागे पाच-दहा रुपये जादा आकारून ग्राहकांची लूट करीत आहेत. ग्राहक तक्रारीसाठीचे उत्पादन शुल्क विभागाचे संपर्क क्रमांक असलेले फलक बहुतांश मद्य विक्रेत्यांनी अडगळीत फेकले असून, काही ठिकाणी ग्राहकांना दिसणार नाहीत, अशा आडबाजूला लावलेले दिसतात. अवैध मद्यविक्रेत्यांसह त्यांना अभय देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागातील काही अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून कारवाईची मागणी आहे.

‘अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी लवकरच व्यापक कारवाई मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. लॉकडाउन निर्बंधांचे पालन करण्यासंदर्भात सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत.’

- संजय सराफ, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभाग

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top