
वाचक पत्र : प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग
---------------------
तळेगाव स्टेशन, ता. २१ : चाकण-तळेगाव रस्त्यावर आज आणखी एका निष्पाप जिवाचा करुण अंत डोळ्यांदेखत झाला. मागच्या आठवड्यात याच ठिकाणी दुचाकीला अपघात होऊन एक युवतीला जबर मार लागला होता. या आणि अशा किती घटना या रस्त्यावर दिवसागणिक वाढतच आहेत, परंतु प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. प्रशासनाने एकदाच काय ते जाहीर करावे की, किती जणांचे जीव गेल्यावर या रस्त्याकडे लक्ष देणार आहे, म्हणजे वर्षानुवर्षे अपेक्षा लावून बसलेलो आम्ही अपेक्षाच सोडून देऊ.
अवजड वाहनांच्या रांगेतून जीव मुठीत घेऊन दुचाकीवर रोजचा प्रवास करतात. परत घरी सुखरूप पोहोचूच याची शाश्वती नाही, एवढी बिकट परिस्थिती झाली आहे. त्यात या मार्गावर श्वानांचा तर अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.
लहानपणापासून खूप अफवा ऐकल्या, पण त्यातली सगळ्यात मोठी अफवा म्हणजे ‘चाकण-तळेगाव रस्त्याचे रुंदीकरण होणार’. आता याला मी स्वतः गांभीर्याने घेत नाही, कारण स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्या एकालाही या रस्त्याचे ‘राजकारण’ करण्यापलीकडे काहीही करता आलेले नाही.
--------------
स्मिता पंडागळे, तळेगाव दाभाडे
--------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..