पिंपरी-चिंचवड : आरटीओमध्ये ३२ भारत सीरिज वाहनांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTO-Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवड : आरटीओमध्ये ३२ भारत सीरिज वाहनांची नोंद

पिंपरी-चिंचवड : आरटीओमध्ये ३२ भारत सीरिज वाहनांची नोंद

पिंपरी - देशभर ‘बीएच’ (भारत) सीरीज (Bharat Series) लाँच झाली. त्याद्वारे दुचाकी व चारचाकी चालकांना राज्य बदलल्यानंतर वाहन नोंदणीची (Vehicle Registration) प्रक्रिया नव्याने करण्याची कटकट मिटली आहे. या सीरिजच्या नंबर प्लेटमुळे देशात कुठेही प्रवास करता येणे शक्य झाले आहे. या सिरीजच्या नंबर प्लेटचा थेट फायदा वाहनचालकांना होत आहे. ज्यांची फिरती नोकरी किंवा व्यवसाय इतर राज्यात आहे, त्यांच्यासाठी एकदाच नोंदणी केल्यानंतर नव्याने नोंदणीची गरज उरली नाही. इतर राज्यांमध्ये सहजरित्या प्रवास करणे सोपे झाले आहे. अशा प्रकारे देशातील चार राज्यांमध्ये फिरणाऱ्या भारत सीरीजमधील चारचाकी २२ व १० दुचाकी वाहनधारकांची नोंद पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत झाली आहे.

भारत सरकारने तीन महिन्यांपूर्वी वाहन नोंदणीसाठी नव्या बीएच सीरीज पद्धतीची घोषणा केली आहे. आंतरराज्य स्थलांतर करणाऱ्यांसाठी ही सेवा उपयुक्त आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इतर कोणत्याही राज्यात बदली झाल्यास, तो नोंदणी न करता त्याचे सध्या चालवत असलेले दुचाकी किंवा चारचाकी वाहन दुसऱ्या राज्यात देखील वापरू शकेल. सध्या दुसऱ्या राज्यात बदली झाल्यास त्यांना प्रथम त्यांचे वाहन रजिस्ट्रेशन असलेल्या राज्यातून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागते. मूळ राज्यातून एनओसी मिळाल्यानंतर, १२ महिन्यांच्या आत वाहनाचे नवीन राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. याशिवाय वाहन खरेदीच्या वेळी १५ वर्षांसाठी भरलेला रोड टॅक्स देखील वाहन मालकाने ज्या नवीन राज्यात ट्रान्स्फर केले आहे तेथे भरावा लागेल. दर दोन वर्षांनी रोड टॅक्स ऑनलाइन भरण्याची सोय आहे.

काय आहे बीएच सीरीज?

नोकरीच्या सोयीनुसार व गरजेनुसार नागरिक विविध कारणास्तव आंतरराज्य स्थलांतर करणे भाग पडत आहे. परराज्यात राहताना स्थानिक आरटीओ, रोड टॅक्ससंबंधी नियम जाचक ठरू लागले आहेत. म्हणूनच देशभर एक वाहन एक रोड टॅक्स असावा, अशी मागणी होऊ लागली. नोंदणी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया त्रासदायक आणि वेळखाऊ आहे. ही गरज ओळखून केंद्र सरकारने बीएच सीरीज सुरू केली आहे. यामुळे स्वतःच्या मूळ राज्यातून आपले वाहन दुसऱ्या राज्यात वापरताना नवीन राज्यात पुन्हा रोड टॅक्स भरण्यापासून सुटका झाली आहे. यामध्ये गाडीचा रोड टॅक्स हा सरसकटपणे १५ वर्षांसाठी न घेता तो दर दोन वर्षांसाठी आकारण्याची सोय आहे. बीएच क्रमांक घेण्याचा पर्याय सध्या नवीन वाहनांसाठी आहे.

कोणते नागरिक नोंदणी करू शकतात?

सरकारी कर्मचारी, सैन्य दलातील व खासगी कंपन्यांमधील कर्मचारी ज्यांची चार राज्यात कार्यालये आहेत. त्यासाठी सरकारी व खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, कंपनीकडून नोकरी करत असलेले प्रमाणपत्र, फॉर्म ६० व पात्र अधिकाऱ्याची सही असणे गरजेचे आहे.

असे आहे स्वरूप

BH नोंदणीचे स्वरूप YY BH ४१४४ XX YY असे ठेवले आहे. यातील YY म्हणजे फर्स्ट रजिस्ट्रेशन. या वर्षातील गाडी असेल तर २१BH१२३४MH असा गाडी नंबर असू शकतो. अर्थात ही सुविधा वैकल्पिक आहे. या वर्षातील गाडी असेल तर २१BH१२३४MH असा गाडी नंबर असू शकतो.

‘सध्या नोकरी किंवा उद्योग धंद्याच्या गरजेनुसार तीन नोव्हेंबर पासून आतापर्यंत ३२ वाहनचालकांची नोंद कार्यालयाच्या अभिलेखावर झालेली आहे. त्यासाठी फॉर्म ६० असणे अत्यावश्यक आहे.’

- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड