आपली माणसं, आपल्या शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपली माणसं, आपल्या शुभेच्छा
कोणी अंतःकरणापासून शुभेच्छा देतंय का शुभेच्छा !

आपली माणसं, आपल्या शुभेच्छा

sakal_logo
By

‘‘कारंडे, हा काय प्रकार आहे? तुम्ही अर्ध्या तासापासून सगळ्यांना नववर्षांच्या शुभेच्छा देत सुटलाय आणि माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं करून पुढं जाताय. तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या नसतील तर तसं सांगा. उगाचंच एखाद्याला असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही.’’ जनुभाऊंनी सोसायटीचे चेअरमन कारंडे यांना धारवेर धरले.
‘‘अहो तसं काही नाही. तुम्हाला ‘पण’ नववर्षाच्या शुभेच्छा.’’ कारंडे यांनी म्हटले.
‘‘तुम्हाला पण म्हणजे? अशा मनाविरूद्ध शुभेच्छा देऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे सकाळपासून तुम्ही मला पाचवेळा भेटलात. त्यावेळी का नाही दिल्या शुभेच्छा? मी म्हटलं म्हणून तुम्ही आता शुभेच्छा देताय. सोसायटीच्या अध्यक्षांना असा भेदभाव करणं शोभतं का? सगळे सभासद तुम्हाला सारखे पाहिजेत. मला नकोत आता तुमच्या शुभेच्छा.’’ जनुभाऊंनी नाराजी व्यक्त केली.
‘‘अहो, माझं लक्ष नसेल.’’ कारंडे यांनी खुलासा केला.
‘‘नसायचंच. आम्ही काय नलिनीबाईसारखे सुंदर आहोत का? शुभेच्छा देताना तुम्ही त्यांना प्राधान्य देणारच. आम्ही कोण?’’ जनुभाऊंनी टोमणा मारल्यावर कारंडे कावरेबावरे झाले.
‘‘शुभेच्छा देताना तुम्ही केलेल्या भेदभावाचा मी सोसायटीच्या आगामी बैठकीत निषेध नोंदवणार आहे.’’ असं म्हणत जनुभाऊ तरातरा निघून गेले. घरी आल्यानंतरही त्यांचा राग शांत झाला नाही. ‘मला शुभेच्छा देत नाही म्हणजे काय? मी काय तुमच्या शुभेच्छांचा भुकेला नाही पण शेजारच्याला देता आणि मला नाही म्हणजे? सोसायटीच्या चेअरमनला असं वागणं शोभतं का?’ असं ते कावेरीबाईंना ऐकवू लागले.
‘‘अहो तुम्ही बाहेर गेला होतात, त्यावेळी अमेरिकेतील जावयांचा तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला होता.’’ हे ऐकून जनुभाऊ आणखी उसळले. ‘‘अमेरिकेतून शुभेच्छा येतात आणि येथं एका सोसायटीत राहूनही चेअरमन शुभेच्छा देत नाहीत, याला काय अर्थ आहे.’’ जनुभाऊंचं हे बोलणं ऐकून कावेरीबाई गप्प बसल्या पण आपणही त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत तर स्वारी आपल्यावरच रागवायची, असे समजून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
‘‘मला डिवचण्याचा तर तुझा हेतू नाही ना?’’ असं म्हणत जनुभाऊ घराबाहेर पडले. रस्त्यात एक तरूण एका तरूणीला ‘हॅपी न्यू इअर’ असं म्हणत होता. ते ऐकून जनुभाऊ उखडले.
‘‘तरूण मुली बघून तुम्हीही नववर्षाच्या शुभेच्छा द्या. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना देतंय का कोणी शुभेच्छा? सोसायटीचे कारंडे तसले आणि तुम्ही त्यांच्यापुढचे.’’ असे म्हणून जनुभाऊ बसमध्ये चढले.
पाच- सहा मिनिटांनंतर कंडक्टरला ते म्हणाले, ‘‘प्रवाशांना तिकीट देताना, त्यांना नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या तर बिघडेल का? पण प्रवाशी तिकिटासारखे शुभेच्छांचे पैसे देणार नाहीत ना? असा विचार तुमच्या मनात असेल ना.’’ पण कंडक्टरने कानात काडी घालून, ‘पुढे सरका..’ चा गजर दिल्याने जनुभाऊंनीही आटोपते घेतले.
शनिपाराजवळील एका दुकानात शिरल्यावर ते मालकाला म्हणाले, ‘‘हे असे हॅपी न्यूअरचे बोर्ड लावण्यापेक्षा तोंडाने शुभेच्छा देत चला की. ’’
‘‘ग्राहकांना नववर्षाच्या तोंड भरून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही दोन कामगारांची नियुक्ती केली आहे. मात्र, आज त्यांची सुटी असल्याने आज तशा शुभेच्छा देता येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही उद्या या.’’ दुकानदाराने खुलासा केला.
‘‘म्हणजे ! केवळ शुभेच्छांसाठी मी उद्या दुकानात परत येऊ का? तेवढा मी रिकामटेकडा नाही,’’ असे म्हणून काहीही खरेदी न करता ते तणतणतच घरी आले. आपल्या घरी सोसायटीतील लोकांची गर्दी पाहून त्यांच्या चेहऱ्यावर तणाव आला.
‘‘आले... आले..’’ असे दोघा- तिघांनी म्हटल्यावर जनुभाऊ कावरे- बावरे झाले. तेवढ्यात कारंडे यांनी ‘हॅपी न्यू इअर’ असं लिहलेला भलामोठा केक बाहेर काढला.
‘‘जनुभाऊ, नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा ! तुमच्या हस्ते केक कापायचा आहे.’’ कारंडे यांनी असं म्हटल्यावर सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला. मग जनुभाऊंनी केक कापल्यानंतर नववर्षाच्या स्वागताचा एकच जल्लोष झाला. ते पाहून जनुभाऊंच्या डोळ्यांत पाणी तरळलं. कावेरीबाईंना केक भरवत ते मोठ्याने म्हणाले, ‘नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top