
विवाहितेच्या छळ प्रकरणी काळेवाडीत दोघांवर गुन्हा
विवाहितेच्या छळ प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काळेवाडी येथे घडला. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत भिकाजी हिंगे (वय ४१, रा. मेन रोड, पिंपरी) व सासू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हनुमंत व फिर्यादी यांचे लग्न वेबसाइटवरून झाले. आरोपीने लग्नानंतर फिर्यादीला पत्नीचा कोणताही दर्जा दिला नाही. सासूने ‘तुला स्वयंपाक नीट येत नाही म्हणून फिर्यादीचा छळ केला. अशाप्रकारे आरोपींनी फिर्यादी यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
निगडी, वाकडमध्ये विनयभंगाच्या घटना
निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक तर वाकड ठाण्याच्या हद्दीत दोन विनयभंगाच्या घटना घडल्या. यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. निगडी पोलिसांनी साहिल कुटे (वय २१, रा. आकुर्डी) याला अटक केली आहे. एका महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीची १२ वर्षीय मुलगी व तिची १३ वर्षीय मैत्रीण या दोघींना एका इमारतीच्या टेरेसवर बोलावून त्यांच्याशी अश्लील कृत्य केले. वाकड पोलिस ठाण्यात एका महिलेच्या फिर्यादीनुसार विलास पवार ऊर्फ महाराज (रा. पाटोदा, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला मोबाईलवरून कॉल करून त्यांच्याशी जवळीक साधली. त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करून अश्लील व्हिडिओ पाठवला. वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात महिलेच्या फिर्यादीनुसार नवनाथ बारणे ऊर्फ तात्या याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी बारणे याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यांच्या मुलीसोबत देखील गैरवर्तन करून त्या दोघींचा विनयभंग केला.
पिंपळे सौदागरमध्ये गॅरेजमध्ये चोरी
गॅरेजचे शटर उचकटून ऐवज चोरल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली. हेमंत अनिल अडवानी (रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक येथे गॅरेज आहे. त्याचे शटर उचकटून चोरट्यांनी एक लॅपटॉप, तीन सीएनजी कंपनीच्या टाक्या व एक स्टॅन्ड असा ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला. सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वाकड, भोसरीत दुचाकी चोरीच्या घटना
वाकड व एमआयडीसी भोसरी परिसरात चोरीच्या दोन घटना घडल्या. यात चोरट्यांनी मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाकड पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये फिर्यादी योगेश गणेश सीतापुरे (वय २२, रा. रहाटणी फाटा, थेरगाव) यांची एक लाख ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली.
तर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायलेन्सर चोरीची घटना घडली. यात तुषार प्रभाकर घोलप (वय ३७, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या त्यांच्या मोटारीचा ४० हजार रुपयांचा सायलेन्सर चोरट्यांनी चोरला. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.