पंचगंगा नदी  प्रदूषणाने माशांच्या अनेक प्रजाती नष्ट

पंचगंगा नदी प्रदूषणाने माशांच्या अनेक प्रजाती नष्ट

14046
प्रदूषणाने माशांच्या प्रजाती नष्ट
---
कठोर कारवाईचा अभाव; जिल्हा प्रशासन प्रदूषण मंडळ कारणीभूत
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : घोगरा, खिरिट, टाकळी, खरप्या, मुळी, झिंगा या माशांच्या जाती आता पंचगंगा नदीमधून नामशेष झाल्याचे येथील मच्छीमार सांगतात. आणखी काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण याला कारणीभूत आहे. अनेकदा संबंधित कारखान्यांना नोटीस पाठविणे, उपाययोजना करण्याचे देखावे केले जातात. प्रत्यक्षात कोणावर कारवाई झाली किंवा शिक्षा झाली, असे आढळले नाही, असेही मच्छीमारांकडून सांगण्यात येते. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे नष्ट होत असलेल्या माशांच्या जाती जतन करणे शक्य होईल.
साखर कारखान्यांचे हंगाम संपताना त्यांच्याकडून नदीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे तसेच मळीमुळे पंचगंगा नदीचे पाणी ठराविक काळात दूषित होते. यातून हजारो मासे मृत्युमुखी पडतात. जेव्हा मोठे मासे मृत होतात, याच वेळी नवीन प्रजनन सुरू असणाऱ्या माशांसह छोट्या माशांचा जीव धोक्यात येतो. परिणामी, कालांतराने माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. मच्छीमारांच्या सांगण्यानुसार १५ वर्षांत किमान आठ ते दहा माशांच्या प्रजाती नष्ट झाल्याचे दिसून येते. मासे मृत होतात, तेव्हा आंदोलने होतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कागदोपत्री कारवाई करतात. मात्र, कोणाला शिक्षा झाली आहे, असे काही अलीकडच्या काळात आढळल्याचे दिसत नाही. परिणामी, प्रदूषण करणारे मोकाट असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्‍यात येते.
प्रत्यक्षात पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम माशांकडून केले जाते, तरीही काही जणांकडून मासेमारीमुळे नदी प्रदूषित होत असल्याचा आरोप केला जातो. या उलट स्थानिक मच्छीमारांनी याबाबत गैरसमज पसरवू नये, अशा आशयाचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. माशांच्या प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.

कोट
कोल्हापूर शहर परिसर, तसेच जिल्ह्यातील आणि एक-एक माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत, काही होत आहेत. यामुळे सुमारे ३० ते ३५ टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पावले उचलून प्रदूषणामुळे पंचगंगा नदीतील मासे मृत होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत.
- नामदेव तिकोने, मासे व्यवसायिक
---

कोट
१९६५ पासून पंचगंगा नदी प्रदूषित होत गेली. चाळीस वर्षांत मासेमारीत अनेक प्रजाती नष्ट झाल्याचे दिसून येते. कारखान्यांच्या मळी, पाणी सोडल्याने नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. आणि किडा-मुंगीही जगत नाही. त्यामुळे मासे पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि मृत्युमुखी पडतात. मागणी जास्त असतानाही सध्या उत्पादनही जास्त झाले असते. बंधाऱ्यावर मासे भरपूर दिसत होते. मात्र, दूषित पाण्यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला आणि कळत-नकळत माशांच्या प्रजातीही नष्ट होत आहेत.
- किसन काटकर, अध्यक्ष, भोईराज फिशरीज सोसायटी
-
कोट
पंचगंगा नदीत शेणखत, मलमूत्र, भाताचा कोंडा असे कोणत्याही पद्धतीचे माशांचे खाद्य मच्छीमारांकडून टाकले जात नाही. काहींनी असा गैरसमज केला आहे. हे खाद्य शेततळ्यांमध्ये टाकले जाते. नदीत नैसर्गिक पद्धतीने प्रजनन होते. भोई समाज पालखी आणि मासेमारी करून उदरनिर्वाह करीत असल्याने त्यांना नाममात्र शुल्कात नदीत मासेमारी करण्याची मुभा राजर्षी शाहू महाराजांनी दिली. आजही आमच्या समाजातील काहींचा उदरनिर्वाह याच मासेमारीवर होत आहे. त्यामुळे प्रदूषणामुळे मासे मृत होऊ नये, याची काळजी पर्यावरणप्रेमींसह प्रशासनानेही घेतली पाहिजे.
- रवींद्र आयरे, माजी अध्यक्ष, भोईराज फिशरीज सोसायटी
---
कोट
पंचगंगा नदीत पूर्वीपासून मासेमारी चालते. मात्र, घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळल्याने नदी प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातून माशांच्या अनेक जाती दुर्मिळ झाल्या. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या नदीत जे मासे सापडतात, ते तलावातील आहेत. प्रदूषण थांबले नाही तर नदीतील मूळ प्रजाती संपून जातील.
- प्रा. एकनाथ काटकर
........
चौकट
* पंचगंगा नदीमधील नामशेष झालेल्या जाती
घोगरा, खिरिट, टाकळी, खरप्या, मुळी, झिंगा
-
* नामशेषच्या मार्गावर असणाऱ्या जाती
वंज, तांबर, खवली, मरळ, मशिड, कोयरा
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com