
विमानतळासाठी 212 कोटी मंजूर
लोगो ः विमानतळ विस्तारीकरण
भूसंपादनासाठी २१२ कोटींची मान्यता
पालकमंत्री सतेज पाटील; शक्ती प्रदत्त समितीचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई/कोल्हापूर, ता. १८ : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२.२५ कोटी देण्याचा निर्णय आज झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा विस्तार महत्त्वपूर्ण आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
ते म्हणाले, ‘विकासाभिमुख जिल्ह्यात पर्यटन, उद्योग, शिक्षण, संस्कृती, कला, तंत्रज्ञान आणि कृषी अशा अनेकविध क्षेत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. या सर्व क्षेत्रातील कोल्हापूरचे महत्त्व हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून या आज झालेल्या बैठकीत अधोरेखित करण्यात आले आहे.’
कोल्हापूर विमानतळ भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली असून विमानतळावरून उडान योजनेंतर्गत हवाई वाहतूक केली जात आहे. तथापि, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी विस्तारीकरण आवश्यक आहे. त्यासाठी २५.९१ हेक्टर क्षेत्र संपादन जरुरीचे होते. यासाठी निधीची आवश्यकता होती. आजच्या आवश्यक २१२ कोटींच्या निधीस समितीने मान्यता दिली असून ही निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.
श्री. पाटील म्हणाले, ‘विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. उर्वरित २६ कोटी निधी २१ मार्च २०२२ ला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरीत झाला आहे. विस्तारीकरणाच्या पुढील निधीसाठी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने २१२.२५ कोटींचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता. तथापि, याला शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीची मान्यता आवश्यक असते. या समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव असून अन्य सदस्य वित्त, नियोजन, उद्योग, गृह व सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आहेत. या समितीने आजच्या बैठकीत माझ्या मागणीचा सकारात्मक विचार करीत २१२ कोटींच्या निधीस मान्यता दिली. यासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
महाविकास आघाडी सरकार जनतेचे सरकार असून राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो.
- सतेज पाटील, पालकमंत्री
--//
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..