मतदारराजा निवडणुकीत सहभागी हो...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारराजा निवडणुकीत सहभागी हो...!
विकासकामांसाठी ३०९ कोटी मंजूर पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीची मान्यता

मतदारराजा निवडणुकीत सहभागी हो...!

sakal_logo
By

लोगो : राष्ट्रीय मतदार दिवस

पुणे, ता. २४ : लोकशाही बळकटीकरणासाठी मतदार राजाने जागरूक राहून विविध निवडणुकीत मतदान केले पाहिजे, अशी निवडणूक आयोगाची माफक अपेक्षा आहे. पण दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी सातत्याने घटताना दिसू लागली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणारी `सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका’ ही संकल्पना घोषित केले आहे. ''मतदारराजा निवडणुकीत सहभागी हो...!'' या ब्रीदवाक्याने लोकशाही बळकटीकरणाठी मदत व्हावी, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे.

देशात मंगळवारी (ता. २५) बारावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे. मतदारांना नकाराधिकार देण्यासाठी २०१३ पासून "नोटा''चा वापर सुरू झाला. त्यापूर्वी बाद मतांचे प्रमाण अधिक असायचे. ईव्हीएमच्या वापरानंतर हे प्रमाण घटले. परंतु "नोटा''चा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली. याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्‍यक आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांमध्ये निवडणूक साक्षरताही होणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने यंदाच्या राष्ट्रीय मतदारदिनी ही नवी संकल्पना घोषित केल्याचे पुण्याच्या उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मृणालिनी सावंत यांनी सांगितले.

हा दिवस केव्हापासून सुरू झाला?
भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी २५ जानेवारी २०११ ला राष्ट्रीय मतदार दिवसाचा प्रारंभ केला. मतदारांमध्ये लोकशाही बळकटीबाबत आणि मतदान करण्यासाठी जनजागृती करणे, हा मुख्य उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे ठेवला जातो. त्यानुसार दरवर्षी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणारी मध्यवर्ती कल्पना (थीम) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते.


मतदानाचा हक्क बजावू या!
आजच्याच दिवशी, म्हणजे २५ जानेवारी १९५० ला भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. हा दिवस देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत हक्क दिलेला आहे. या दिवशी १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची नोंद करून त्यांना आयोगाचे ओळखपत्र दिले जाते. संविधानाच्या अनुच्छेद ३२६ नुसार प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. मात्र देशात आजही मतदानाबाबत गांभीर्य दिसत नाही. कोणत्याही निवडणुकीत ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान होताना दिसत नाही. मतदारांचा हा निरुत्साह लोकशाहीला मारक आहे. मतदानादिवशी राष्ट्रीय सुट्टी असते, पण एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडणार या भावनेतून या दिवशी मतदान करण्याऐवजी लोक सहलीला जातात.

मतदारांची सद्यःस्थिती
देशातील एकूण मतदार संख्या --- ९३ कोटी ३६ लाख
महाराष्ट्रातील एकूण मतदार --- ९ कोटी ८८ लाख ४४ हजार ५६७
पुणे जिल्ह्यातील मतदार ---- ८१ लाख ५८ हजार ५३९

राष्ट्रीय मतदार दिनाच्या यंदाच्या मध्यवर्ती कल्पनेनुसार दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील उपेक्षित घटकांतील व्यक्तींना विचारात घेऊन मतदार जागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे यंदाचा राष्ट्रीय मतदार दिवस हा ऑनलाइन साजरा केला जाणार आहे.
मृणालिनी सावंत,
उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top